बंडखोर गीता जैन १५ हजार ५३५ मतांनी विजयी

मीरा भाईंदर मतदारसंघात भाजपचे नरेंद्र मेहता यांचा पराभव करून भाजपच्या बंडखोर उमेदवार गीता जैन विजयी झाल्या. त्यांनी मेहता यांचा १५ हजार ५३५ मतांनी पराभव केला. कोणतेही संघटनात्मक पाठबळ नसलेल्या अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्याकडून मेहता यांचा बालेकिल्लय़ातच पराभव झाल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून जैन यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. उत्तनपासून ते राई, मुर्धा, मोर्वा या गावांमध्ये जैन यांनी मेहता यांच्या तुलनेत लक्षणीय मते घेतली. उत्तनमध्ये शिवसेनेच्या पाठिंब्यावर गीता जैन यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेतली, पाठोपाठ काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांनी दुसऱ्या क्रमांची मते घेतली तर मेहता यांना याठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भाईंदर पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला, मात्र याठिकाणी देखील जैन यांनी जोरदार मुसंडी घेतली. त्यामुळे पहिल्या १० फेऱ्यांमध्ये जैन यांनी मेहता यांच्यावर सुमारे ११ हजारांची आघाडी घेतली.

भाईंदर पश्चिम भागातील पिछाडी नरेंद्र मेहता हे भाईंदर पूर्व भागातील खारीगाव आणि जेसल पार्क भागात भरून काढतील अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना वाटत होती. मात्र, गीता जैन यांनी याठिकाणी देखील मेहता यांना धोबीपछाड देत आघाडी वाढवत ती २१ हजारांपर्यंत नेली. मीरा रोडचा नयानागर हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे काँग्रेसचे मुझप्पर हुसेन चांगली मते घेतील ही अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी ८० टक्कय़ांहून अधिक मते घेतली. याठिकाणी मेहता यांनी दुसऱ्या क्रमांकाची आणि गीता जैन यांना तिसऱ्या क्रमांकाची मिळाली.

मीरा रोडच्या शांतीनगर ते पेणकर पाडा या पट्टय़ात कोण जास्त मते घेतो याकडे सर्वाच्याच नजरा लागून राहिल्या होत्या. शांतीनगरमधील जैन, गुजराती मतांचा मोठा हिस्सा गीता जैन भाईंदरप्रमाणे आपल्याकडे वळतील असा जाणकारांचा होरा होता, असे झाले तर गीता जैन यांची आघाडी ३० हजारांचा टप्पा पार पडेल अशीच स्थिती होती. मात्र याठिकाणी मेहता यांनी शांतीनगर ते सृष्टी परिसरात आपले वर्चस्व सिद्ध करत पहिल्या क्रमांकाची मते मिळवली. या भागात मुझप्फर हुसेन यांनीदेखील चांगली मते घेतली. काही फेऱ्यांमध्ये हुसेन दुसऱ्या क्रमांकावर आणि जैन तिसऱ्या क्रमांवर राहिल्या. याठिकाणी मिळालेल्या मतांमुळे जैन यांनी घेतलेली आघाडी काही प्रमाणात कमी करण्यात मेहता यशस्वी ठरले.

महामार्गालगतचा पेणकर पाडा आणि मीरा गाव हा शिवसेनेचा गड. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उघडपणे गीता जैन यांचा प्रचार करत होते. त्यामुळे जैन पेणकर पाडा आणि मीरा गावात एकतर्फी मते मिळवतील असेच चित्र होते. मात्र, याठिकाणीदेखील भाजपचे नरेंद्र मेहता यांनी चांगली मते घेतल्याने जैन यांची आघाडी १५ हजार ५३५ मतांपर्यंत मर्यादित राहिली. जैन यांना ७९ हजार ५२७, भाजपचे मेहता यांना ६३ हजार ९९२ आणि काँग्रेसचे हुसेन यांना ५५,८९९ इतकी मते मिळाली.

मेहता मतमोजणी केंद्रात फिरकलेच नाहीत

भाईंदर : मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. विजयाचा ठाम विश्वास असणारा उमेदवार साधारणपणे सुरुवातीपासूनच मतमोजणी केंद्रात हजर असतो. मात्र, भाजपचे नरेंद्र मेहता मतमोजणी केंद्रात आलेच नाहीत. पहिल्या फेरीपासूनच गीता जैन यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केल्यानंतर केंद्राबाहेर जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा विश्वास डळमळू लागला. जैन यांनी निर्णायक आघाडी घेताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. विसाव्या फेरीनंतर चित्र एकदम स्पष्ट झाल्यानंतर गीता जैन मतमोजणी केंद्रात दाखल झाल्या. यावेळी त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांची देखील मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

यंत्रात बिघाड

मतमोजणीत तीन यंत्रांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे  मतांची मोजणी करण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्यांचा आधार घेण्यात आला. ही मोजणी झाल्यानंतर अंतिम निकाल घोषित करण्यात आला. भ्रष्टाचारा विरोधात सुरू केलेली लढाई मी जिंकली आहे. ही निवडणूक जनतेने लढली आणि जनतेचाच विजय झाला. – गीता जैन