विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना अत्यल्प कालावधीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रचार फेरी, ‘रोड शो’, प्रत्यक्ष गाठीभेटी असे विविध पर्याय अवलंबले जात आहेत. ‘स्टार प्रचारक’च्या जाहीर सभा होत आहेत. सत्ताधारी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धुराळा उडाल्यानंतर अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराला सर्व राजकीय पक्षांना मोजकाच कालावधी मिळाला आहे. या अवधीत शक्य त्या मार्गाने प्रचार करण्याचे धोरण राजकीय पक्षांनी अवलंबल्याने भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभांचा धडाका लावण्यात आला आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागात सटाणा आणि चांदवड येथे जाहीर सभा नुकत्याच झाल्या. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ झाली. दुसरीकडे शिवसेनेकडूनही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे इगतपुरीत प्रचारार्थ येऊन गेले. सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ग्रामीण भागात दिंडोरी आणि येवला येथे जाहीर सभा झाली. सत्ताधारी पक्षाकडून प्रचारासाठी स्टार प्रचारक उतरत असताना राष्ट्रवादीकडून शहर आणि ग्रामीण भागात खासदार अमोल कोल्हे यांची बाईक रॅली आणि रोड शो घेत प्रचारात रंगत आणली.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची १७ ऑक्टोबरला सटाणा, निफाड, नांदगाव तालुक्यात, तर शहरातील नाशिक पूर्व विधानसभा आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली आहे. जिल्ह्य़ात सकाळी १० वाजता सटाणा, दुपारी साडेबारा वाजता पिंपळगाव बसवंत, दुपारी तीन वाजता नांदगाव येथे सभा होणार आहे. शहरात देवळाली मतदारसंघातील उमेदवार सरोज अहिरे, नाशिक पूर्वतील उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभा सायंकाळी पाच वाजता पंचवटीतील मखमलाबाद येथे, तर नाशिक पश्चिमचे उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ सायंकाळी सात वाजता सिडको येथे सभा होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेदेखील ठिकठिकाणी सभा घेत असून गुरुवारी त्यांची जानोरी, कळवण, ताहाराबाद येथे सभा होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमधील सभा दरवेळी लक्षवेधी ठरते. यंदा त्यांच्या सभेचे ठिकाण बदलले आहे. दरवेळी त्यांची सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होते. मात्र मैदानावरील दुरुस्ती कामामुळे यावेळी राज यांची सभा गुरुवारी गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होणार आहे. या सभेविषयी नाशिककरांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.