राज्य चालवण्याचा आदर्श यशवंतराव चव्हाणांनी घालून दिला, आज मात्र राज्यकर्ते विकासापासून दूर गेले असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्याकडे भविष्यात मोठी जबाबदारी देणार असून त्यांच्याकडे फक्त आमदार म्हणून नाही तर कर्तृत्ववान पिढीचे नेतृत्व म्हणून पाहतो आहे, आगामी काळात आशुतोषला सोबत घेवून कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कोपरगाव येथे राष्ट्रवादी, कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत श्री. पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. पवार पुढे म्हणाले की, ज्या धनदांडग्यांनी ८० हजार कोटी रुपये बुडविले त्यांचे पैसे सरकारने भरले, मात्र शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे राहायला तयार नाही. शेतकरी या सरकारच्या कारभाराला वैतागले असून बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वी तेथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, यावरून शेतकरी कोणत्या परिस्थितीत आहे, याची कल्पना येते. भाजपा सरकारच्या काळात नविन उद्योग तर चालू झाले नाही मात्र हजारो कारखाने बंद पडल्याने बेरोजगारी वाढली आहे. सरकारने फक्त आश्वासने दिली मात्र पूर्ण एकही केले नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाच वर्षांत एक विटही रचली गेली नाही आंबेडकरांच्या स्मारकाची केवळ घोषणाच झाली, महाराजांच्या गडकिल्ल्यात सरकार आता छमछम सुरू करणार. गडकिल्ल्यात नाचगाणी करणार का? या सरकारला लाज वाटली पाहीजे. १९७८ मध्ये मुख्यमंत्री झालो त्यावेळी जी वडीलधारी माणसे माझ्यासोबत होती त्यामध्ये शंकरराव काळे अग्रभागी होते, त्यांनी शेवटपर्यंत मला साथ दिली असेही पवार यांनी सांगितले.

उमेदवार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगावच्या निष्क्रिय आमदार स्वत:लाच कार्यक्षम अशी विशेषणे लावून घेत आहेत. तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला, सवलतींपासुन वंचित राहीला त्यावेळी या कार्यक्षम आमदार काय करीत होत्या? तालुक्याच्या शेतकऱ्यांचे रब्बीचे अनुदान नाकारले गेले, शेतीसाठी अडीच किलोमीटरपर्यंतच पाणी दिले, त्यावेळी त्या काय करीत होत्या? गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे १०० टीएमसी पाणी जायकवाडीला वाहून जात असतांना शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्मवर विकत पाणी देत होते त्यावेळी, समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी केला जात होत्या, त्यावेळी तालुक्याच्या कार्यक्षम आमदार गप्प होत्या. शेतकऱ्यांचा संप मोडीत काढणाऱ्या आमदारांनी माझ्यावर आरोप केले मी स्मार्टसिटी तालुक्याच्या बाहेर घालविली. पण ज्या ठिकाणी स्मार्टसिटी होणार आहे त्या ठिकाणी जमिनी कोणाच्या आहेत? यावेळी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, भाजप शहर चिटणीस संतोष डागा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिवसेनेचे शिवसनेचे माजी नगरसेवक डॉ. अजय गर्जे यांनी काळे यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, लताताई शिंदे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे, संदीप वर्पे, पद्माकांत कुदळे, सुनील गंगुले, चारूदत्त सीनगर, कपिल पवार, संभाजी काळे, अशोक खांबेकर, सुनील साळुंखे, विजय त्रिभुवन आदी उपस्थित होते.