वर्सोवा, वांद्रे, अंधेरी, घाटकोपरमध्ये ३७ उमेदवारांच्या तलवारी म्यान; मात्र, महाडेश्वर, लटके, लव्हेकर यांच्या अडचणीत वाढ

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील ३७ उमेदवारांनी लढाईआधीच रिंगणातून माघार घेतली. मात्र, वसरेवा, वांद्रे पूर्व आणि अंधेरी या तीन ठिकाणी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांविरोधात अपक्ष उभ्या ठाकलेल्या बंडखोरांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे वसरेव्यात भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर, वांद्रे पूर्व येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि अंधेरीत रमेश लटके यांच्या विरोधात बंडखोरांचे आव्हान कायम आहे. घाटकोपरमध्येही भाजपचे राम कदम यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय भालेराव यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान

होणार आहे. ७ ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी ३६ मतदारसंघांतून तब्बल ३७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३३३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

काँग्रेस, मित्र पक्षांच्या उमेदवारांनी बहुतांश ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. बोरिवलीमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार कुमार खिलारे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. परंतु, सोमवारी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. मुलुंडमध्ये काँग्रेसने गोविंद सिंह यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी पक्षाचे निष्ठावंत आर. आर. सिंह यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात पक्षाचे पदाधिकारी यशस्वी ठरले. सोमवारी त्यांनी उमेदवारी मागे घेत येथील बंडखोरी टाळली.

बंडखोरांची डोकेदुखी शिवसेना-भाजप युतीसमोर जास्त आहे. साऱ्या मुंबईचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पूर्व भागात शिवसेनेच्या आमदार तृप्ती सावंत यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. खुद्द मातोश्रीच्या अंगणातच विद्यमान महापौर व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी एकप्रकारे शिवसेनेलाच आव्हान दिले आहे.

वर्सोव्यामध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या एकनिष्ठ नगरसेविका राजुल पटेल यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही.   राजुल पटेल यांचा या भागात चांगला जनसंपर्क असल्याने  भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी आव्हान दिले आहे. त्यांनीही आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे या विभागात शि़वसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. वसरेव्यातील शिवसेनेच्या बंडखोरीलाला अंधेरीतून भाजपने उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

वरळीत सर्वाधिक उमेदवार

शहर भागात सर्वात कमी म्हणजेच चार उमेदवार माहीम आणि शिवडी मतदारसंघात आहेत. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आदित्य ठाकरे यांच्या वरळी येथील मतदारसंघात सर्वात जास्त १३ उमेदवार रिंगणात आहेत. उपनगरात चांदिवली व अणुशक्तीनगर मध्ये सर्वाधिक १५ उमेदवार आहेत. तर बोरिवली आणि वांद्रे पश्चिममध्ये सर्वात कमी म्हणजे चार उमेदवार आहेत.

राम कदम यांची डोकेदुखी

घाटकोपर पश्चिममध्ये विद्यमान आमदार राम कदम महायुतीचे उमेदवार आहेत.  हा मतदारसंघ भाजपकडे आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत असलेले संजय भालेराव यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला होता. त्यांनी ही आपला अर्ज कायम ठेवला आहे. मध्यंतरी मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत आले होते. त्यात भालेराव यांच्या पत्नी व नगरसेविका डॉ. अर्चना भालेराव यांचाही समावेश होता. भालेराव यांच्या बंडखोरीमुळे मराठी मतांचे विभाजन होणार आहे.