कल्याणमधील दोन मतदारसंघांत युतीसमोर आव्हान; अंबरनाथमध्ये आघाडीला धक्का; उल्हासनगरात ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या उमेदवार

ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या ३८ उमेदवारांनी सोमवारी निवडणुकीतून माघार घेतली असून यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकूण २१३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. कल्याण पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना-भाजप युतीमध्ये बंडखोरी तर अंबरनाथ मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाली आहे. उल्हासनगर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार ज्योती कलानी या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. मात्र, युती आणि आघाडीच्या जागावाटपमध्ये मतदारसंघ मिळाला नसल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ३०० उमेदवारांनी ३७२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीमध्ये ४९ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. अनेक ठिकाणी युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान युती आणि आघाडीच्या नेत्यांपुढे उभे ठाकले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ७ ऑक्टोबर ही अखेरची मुदत होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून युती आणि आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरांशी संपर्क साधून त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरही अनेकांनी अर्ज मागे घेतले नसल्यामुळे युती आणि आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

एमआयएमचा अर्ज मागे

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये एमआयएमतर्फे बरकततुल्लाह अलीहसन शेख यांनी अर्ज दाखल केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची काहीशी डोकेदुखी वाढली होती. मात्र, सोमवारी बरकततुल्लाह यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात आव्हाड आणि शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांची लढत होणार आहे.

नरेंद्र पवार, बोराडे रिंगणातच

कल्याण पुर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्या विरोधात उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोराडे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात विद्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. या दोन्ही मतदारसंघांत युतीच्या नेत्यांनी बंडखोरी रोखण्यात अपयश आले आहे.

मनधरणी फोल

अंबरनाथ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण खरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आघाडीच्या नेत्यांनी खरात यांचा अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अर्ज मागे घेतला नाही.

 

 

 

कलानींच्या हाती घडय़ाळ

उल्हासनगर मतदारसंघात ओमी कलानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत अर्ज बाद ठरल्यानंतर अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही ओमी यांनी सोमवारी मागे घेतला आहे. त्यामुळे उल्हासनगर विधासभा मतदारसंघात पुन्हा एकदा ज्योती कलानी याच राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याचे निश्चित झाले आहे.