वसरेवा, अंधेरी, वांद्रे पूर्वमधील बंडखोरांवर लक्ष

मुंबईतील विधानसभेच्या ३६ मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी यांच्या थेट लढत होणार असली तरी, यातील जेमतेम १२ मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यातही वांद्रे पूर्व, अंधेरी पूर्व आणि वसरेवा तसेच भायखळा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार असून त्यांपैकी तीन मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांसमोर पक्ष किंवा मित्रपक्षातील बंडखोरांचे आव्हान आहे.

विधानसभा निवडणूकांसाठी युती आणि आघाडीने अतिशय गोपनीयता राखत उमेदवारांची नावे जाहीर केली. कोणतीही बंडखोरी होऊ नये याकरिता काळजी घेतली. मात्र तरीही मुंबईत तीन ठिकाणी युतीला विरोधकांबरोबरच बंडखोरीशीही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे वांद्रे पूर्व, वर्सोवा, अंधेरी पूर्वमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्याचबरोबर भायखळा मतदार संघातही तिरंगी लढत होणार आहे. तर १२ मतदारसंघांत चुरशीची लढत होणार आहे.

वर्सोवामध्ये भाजपच्या विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी बंडखोरी केली आहे. राजुल पटेल यांचा या मतदार संघात चांगला जनसंपर्क आहे. याच मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांना उमेदवारी दिली आहे. मनसेचेही या मतदारसंघात मतदार असून देसाई यांचाही या मतदारसंघात जनसंपर्क आहे. त्यामुळे  येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे उमेदवार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. तृप्ती सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढतीची शक्यता आहे.

अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके हे उमेदवार आहेत. तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी या विभागात बंडखोरी केली आहे. येथून काँग्रेसने विद्यमान नगरसेवक जगदीश कुट्टी यांना उमेदवारी दिली आहे.

भायखळा येथे शिवसेनेने माजी नगरसेविका यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबईतील एमआयएमचे एकमेव विद्यमान आमदार वारिस पठाण हेदेखील निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने माजी आमदार मधू चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर याच मतदारसंघात अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यादेखील आपले नशीब आजमावणार  आहेत.

या मतदारसंघांमध्ये चुरस

  • दिंडोशीमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार माजी महापौर सुनील प्रभू यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण यांच्यात लढत आहे.
  •  वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार यांना काँग्रेसच्या आसिफ झकेरिया यांचे आव्हान असेल.
  •  मालाडमध्ये शिवसेनेच्या रमेश ठाकूर यांची लढत विद्यमान आमदार अस्लम शेख यांच्याशी होणार आहे.
  • चांदिवलीत शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार नसीम खान यांच्यात लढत होणार आहे.
  • मानखुर्दमध्ये शिवसेनेचे विठ्ठल लोकरे आणि समाजवादीचे विद्यमान आमदार अबू आजमी यांच्यातील लढतही रंगतदार होण्याची शक्यता आहे.
  •  अणूशक्तीनगरमध्ये शिवसेनेचे तुकाराम काते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक असा सामना रंगणार आहे.
  • चेंबूरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश फातर्फेकर यांची काँग्रेसचे माजी आमदार, माजी महापौर चंद्रकांत हंडोरे यांच्यात लढत आहे. दलित आणि बहुजन समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात चुरस होण्याची शक्यता आहे.
  •  माहीममध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर विरुद्ध मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे ही लढतही चर्चेची आहे. दादर या बालेकिल्ल्यावर दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतो.