02 June 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यत ठिकठिकाणी युतीतच रस्सीखेच!

प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जयेश सामंत-भगवान मंडलिक

ठाण्यात केळकर यांच्या प्रचारापासून शिवसेना नेते दूरच; कल्याणमध्ये गायकवाड यांच्याविरोधात बंडखोराला साथ:- ठाणे : ‘आमचं ठरलंय’ असे सांगून निवडणुकीत युती करणाऱ्या शिवसेना-भाजपमधील स्थानिक पातळीवरील संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकामागे आपली ताकद लावली आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील १८ मतदारसंघांपैकी काही अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयातील दरी अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिम या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांत उघडपणे बंड झाल्याने त्याचे पडसाद आता जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघांत पाहायला मिळू लागले आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर येथील नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केल्याने भाजपचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड दुखावले गेले आहेत.  त्यांनी थेट पालकमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर येथे शिवसेनेची फळी अधिक ताकदीने बोडारे यांच्यामागे उभी राहिल्याचे चित्र आहे.

कल्याण पूर्वेत मागील १० वर्षांत गटार, पायवाटांव्यतिरिक्त एकही विकासाचे भव्यदिव्य काम झाले नाही, असा आरोप करीत शिवसेनेच्या कल्याण पूर्व, उल्हासनगरमधील १२५ हून अधिक शाखाप्रमुख, नगरसेवक, विभागप्रमुख, संघटक यांनी पदाचे राजीनामे देऊन बोडारे यांचा प्रचार सुरू केला आहे. आमची रास्त मागणी वरिष्ठ पक्षीय पातळीवर मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे देऊन केवळ ठोकळेबाजपणे काम करणारा उमेदवार आमच्यावर पुन्हा लादला म्हणून नाराजी व्यक्त केली आहे, असे शिवसेनेचे प्रशांत काळे यांनी सांगितले.

भाजपची मनसेला साथ?

कल्याण ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस आघाडीने उमेदवार न देता मनसे उमेदवार राजू पाटील यांना साथ दिली आहे. या मतदारसंघातील दिवा आणि आसपासच्या परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी फळी असून ही मंडळी स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे राजू पाटील यांच्यामागे भाजपचे काही स्थानिक नेते ताकद उभी करत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्या आहेत. शिवसेनेनेही येथे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने येथील चुरस वाढली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेतील नाराजांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्या तरी अजूनही त्यांना स्थानिक शिवसैनिकांकडून हवी तशी साथ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 12:58 am

Web Title: vidhan sabha election shiv sena mns bjp akp 94
Next Stories
1 परतीच्या पावसाने उपनगरांना झोडपले
2 संघशरण जाण्याचा शिरस्ता युतीमुळे मोडीत?
3 वसईत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा
Just Now!
X