काँग्रेसमध्ये संताप; तर उल्हासनगर, मुरबाडमध्ये प्रतिक्रिया उमटेल

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेविरोधात ताकदवान उमेदवार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणीचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, ते अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात आले नाहीत. त्यामुळे अंबरनाथमध्ये आघाडीत बिघाडी झाली आहे.

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर निवडून येत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपली छाप पाडता आली नाही.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. काँग्रेसतर्फे रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात आली.आघाडी असतानाही अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रवीण खरात यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे मतदारसंघात काँग्रेसच्या गोटातून संताप व्यक्त होत होता. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा, अशी आशा काँग्रेसतर्फे व्यक्त केली जात होती.

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले जात होते. अंबरनाथ तहसील कार्यालयाबाहेरून प्रवीण खरात यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र खरात संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने काँग्रेस उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची चलबिचल सुरू होती. शेवटच्या क्षणी खरात यांच्याशी संपर्क  झाला, मात्र वेळ निघून गेल्याने अर्ज मागे घेता आला नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारासमोर उभा ठाकणार आहे.

यामुळे काँग्रेसमधून संताप व्यक्त होत असून आघाडीचा उमेदवार म्हणून वरिष्ठांनी पत्र जाहीर न केल्यास आक्रमक भूमिका घेणार असल्याचे काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी सांगितले आहे.

तर आमच्याशी दगाफटका झाला तर उल्हासनगर आणि मुरबाड मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी त्यांनाही दगाफटका होईल, अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे यांनी दिली आहे.