27 May 2020

News Flash

झोपडपट्टीवासीय, स्थानिक रहिवाशांचा कौल महत्त्वाचा

पिंपरी विधानसभेसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे  माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यातच पुन्हा सामना होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| बाळासाहेब जवळकर

पिंपरीत अण्णा बनसोडे-गौतम चाबुकस्वार पुन्हा आमने-सामने :– पिंपरी विधानसभेसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे  माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यातच पुन्हा सामना होणार आहे. गेल्यावेळी चुरशीच्या लढतीत बनसोडे यांचा अवघ्या २२०० मतांनी पराभव करून चाबुकस्वार निवडून आले. कमळ चिन्ह न घेतल्याचा फटका बसल्याने रिपाइंच्या चंद्रकांता सोनकांबळे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

विद्यमान आमदार असल्याने शिवसेनेकडून पिंपरीवर हक्क सांगितला गेला. तर, आमची ताकद वाढल्याचे कारण देत भाजपकडून दावा करण्यात आला. गेल्यावेळी तुल्यबळ लढत दिल्याच्या कारणास्तव रिपाइंकडून पिंपरीची मागणी होत होती. लोकसभा निवडणुकीत पिंपरीतून श्रीरंग बारणे यांना ४१ हजाराचे मताधिक्य मिळाले. तेव्हापासून शिवसेनेने पिंपरीची मागणी लावून धरली होती. अखेर, ज्या पक्षाचा आमदार, त्यांना मतदारसंघ या तत्त्वाने पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळाला. शिवसेनेने चाबुकस्वार यांनाच पुन्हा रिंगणात उतरवले. ते निष्क्रीय असल्याचा मुद्दा पुढे करत शिवसेनेतूनच चाबुकस्वारविरोधी मोहीम सुरू झाली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दटावल्यानंतर ती मोहीम थंडावली. मित्र पक्षांमधील इच्छुकांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केले. भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ वगळता बहुतेक सर्वानी ते मागेही घेतले. वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही बंडाळी झाली होती. राष्ट्रवादीतही बरेच नाराजीनाटय़ झाले. बनसोडे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध झाल्याने त्यांचे तिकीट कापण्यात आले. शेखर ओव्हाळ, राजू बनसोडे अशी नावे चर्चेत होती. सोनकांबळे राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अनपेक्षितपणे नगरसेविका सुलक्षणा धर (शीलवंत) यांचे नाव जाहीर झाले. त्यानंतर, राष्ट्रवादीतील वातावरण ढवळून निघाले. त्यांची उमेदवारी पक्षात फारशी कोणाला मानवली नाही. बनसोडेंना कडवा विरोध करणारेच नंतर त्यांची शिफारस करू लागले. अन्यथा, पिंपरी हातातून जाईल, असे उघडपणे सांगू लागले. माझं काय चुकलं, असा प्रश्न उपस्थित करत बनसोडेंनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले. अखेर, उमेदवार बदलण्याची वेळ राष्ट्रवादीवर ओढावली.

अण्णा बनसोडे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आल्याने चाबुकस्वार यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. स्वकियांची नाराजी त्यांच्यादृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. तर, राष्ट्रवादीतील पडझड आणि गटबाजी ही बनसोडेंना त्रासदायक ठरणारी आहे. काँग्रेस, रिपाई, मनसे, वंचित आघाडी, एमआयएम असे विविध घटक मतदारसंघात आहेत. प्रत्येकाची स्वतंत्र ताकद आहे. चुरशीच्या या लढतीत त्यांची भूमिका निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते.

उमेदवार तेच, प्रश्नही तेच

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पिंपरीत झोपडपट्टय़ांचे प्राबल्य आहे. त्याचप्रमाणे स्थानिकांचा प्रभावही मोठा आहे. या दोन्हींचा मेळ घालण्यात २००९ मध्ये अण्णा बनसोडे यशस्वी झाले होते. गेल्या वेळी तिरंगी लढत झाल्याने मतांच्या विभागणीचा फायदा चाबुकस्वारांना झाला होता. यंदा पुन्हा बनसोडे-चाबुकस्वार आमने-सामने आहेत. बेकायदा बांधकामे, शास्तीकर, वाढती गुन्हेगारी, विस्कळीत पाणीपुरवठा, संरक्षण खात्याचे प्रश्न असे मुद्देही तेच आहेत. विद्यमान आमदारांविषयी बऱ्यापैकी नाराजी आहे. पाच वर्षांत संपर्क नाही, अशी त्यांच्याविषयी सार्वत्रिक तक्रार आहे. निष्क्रीय असले तरी आमदारांचा कोणालाही त्रास नसल्याचे सांगत महायुतीची हक्काची मते ही त्यांची जमेची बाजू सांगितली जाते. गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झाल्याने बनसोडे यांच्याविषयी थोडीशी सहानुभूतीही दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:22 am

Web Title: vidhan sabha election shiv sena ncp akp 94 2
Next Stories
1 कॅन्टोन्मेंटमधील लढत भाजप-काँग्रेससाठी प्रतिष्ठेची
2 world mental health day : आत्महत्या टाळण्यासाठी गरजूंना द्या मदतीचा हात
3 सत्तेत असताना पाच वर्षे उद्धव ठाकरे झोपले होते काय?
Just Now!
X