पक्षांतर्गत कुरबुरीचा सेनेला फटका बसण्याची शक्यता

उमेदवारी डावलण्यात आल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज दाखल करणाऱ्यांची बंडखोरी शमवण्यात शिवसेनेला यश आले असले तरी, अशा बंडखोरांची नाराजी पक्षाला मिटवता आलेली नाही. मानखुर्द-शिवाजी नगर आणि भांडूप या दोन मतदारसंघांत शिवसेनेच्या उमेदवारांना पक्षांतर्गत कुरबुरी त्रासदायक ठरण्याची भीती आहे.

मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघात काँग्रेसमधून स्वगृही परतलेल्या विठ्ठल लोकरे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघातील माजी नगरसेवक सुरेश तथा बुलेट पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावत उमेदवारी अर्ज दाखल केला. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरच्या दिवशी पाटील यांना मातोश्रीवरून उमेदवारी मागे घेण्याची सूचना आली. ती मान्य करून पाटील यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांची नाराजी मात्र कायम आहे.

या मतदारसंघात ८२ टक्के मुस्लीम, ८ टक्के मातंग समाजाची मते आहेत. पाटील यांची मुस्लीम मतदारांवर चांगली पकड आहे. त्याच जोरावर त्यांनी गेल्या विधानसभा लढतीत समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांना कडवी झुंज देत ३७ हजार मते घेतली होती. गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षानेही येथे पाय रोवण्यास सुरुवात केल्याने पाटील यांची उमेदवारी युतीला फायदेशीर ठरली असती, अशी चर्चा मतदारसंघात आहे. दुसरीकडे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले लोकरे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. काँग्रेसला उतरती कळा लागताच त्यांनी पक्षांतर केले. त्यामुळे त्यांची उमेदवारी पाटील यांच्यासह येथील निष्ठावंत शिवसैनिकांना जिव्हारी लागली. ही नाराजी लोकरे यांच्या प्रचारात दिसून येत आहे. ‘पक्षाचा आदेश मी मान्य केला. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत मी मतदारसंघ सोडून कुठेही जाणार नाही. निकालानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल,’ अशी प्रतिक्रिया पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

भांडुप मतदारसंघातही उमेदवारीवरून धुसफुस आहे. उमेदवारी न मिळाल्याने विद्यमान आमदार अशोक पाटील नाराज आहेत. नगरसेवक आणि विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांना उमेदवारी मिळाल्यापासून पाटील भांडुपमध्ये दिसलेले नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईबाहेर गेले आहेत. नेमकी हीच परिस्थिती मुलुंडचे विद्यमान आमदार सरदार तारासिंह यांची आहे. मुलुंडमधील युतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचारात तारासिंह फारसे सक्रिय नसल्याचे सांगण्यात येत आहे.