३५ मतदान केंद्रांवर ० ते ५ टक्के मतदान; वाढवण परिसरातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट

डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदरविरोधात आणि नागरी समस्यांकडून दुर्लक्ष केल्याने जिल्ह्य़ातील अन्य परिसरातील मतदारांनी उगारलेल्या बहिष्कारअस्त्रामुळे मतदानावर परिणाम झाला आहे. पालघरमधील ३५ मतदान केंद्रांवर शून्य ते पाच टक्के मतदान नोंदवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. वाढवण परिसरातील अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात वाढवण, वरोर, तडियाळे, गुंगवाडा, धाकटी डहाणू या गावांनी मतदानावर संपूर्ण बहिष्कार टाकला. मतदारांच्या बहिष्कारामुळे पालघर व डहाणू मतदारसंघांतील मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला आहे. वाढवण बंदरामुळे मासेमारीवर परिणाम होणार असून परिसरातील गावांवरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे, असे सांगत वाढवण बंदराविरोधात बंदरपट्टीच्या गावांनी पुकारलेले बहिष्काराचे लोण आसपासच्या गावांतही पोहोचले आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी ठाम भूमिका या गावांनी घेतली आणि त्याचे पालन या गावांनी केले.

सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या गावांचा मतदानावर बहिष्कार कायम होता. पालघरमध्ये चिंचणी गावाबरोबर दांडीपर्यंत बहिष्काराचे लोण पसरले आहे, तर वासगाव वरोर, अभ्राण, डहाणू गाव, नरपड, चिखले या गावांतील मच्छीमार समाजाने तीव्र विरोध दर्शवला.

केळवेच्या मतदारांचीही मतदानाकडे पाठ

केळवे रोड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या व मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी केळवा रोड पूर्वेकडील रहिवाशांनी टाकलेले बहिष्काराचे सावट मतदानाच्या दिवशी दिसून आले. झांझरोळी, केळवे रोड, मायकोप व वाकसई या मतदान केंद्रांवर मतदारांनी पाठ फिरवली असल्यामुळे या भागात संध्याकाळपर्यंत अत्यल्प मतदान झाले. काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. झांझरोळी येथे असलेल्या मतदान केंद्रात दुपारी बारा वाजेपर्यंत फक्त दोघांनी मतदान केले. त्यानंतरही मतदानाची टक्केवारी वाढली नाही. या परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूर्व भागातील रुग्ण, गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे उड्डाणपूल, चांगले रस्ते अशा मागण्या आहेत, असे अनंता ठाकरे आणि स्मिता ठाकरे या मतदारांनी सांगितले.

वाढवण परिसरातील गावांत शेती व्यवसायासह रोजगार शिक्षणाच्या सुविधा आहेत. आमच्या गावात आमचा विकास आहे. त्यामुळे हे विनाशकारी बंदर नको. त्यामुळे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकला. – हेमंत कडू ग्रामस्थ, वाढवण-तिघरेपाडा