योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन

आघाडी सरकारच्या काळात उत्तर भारतीय कामगारांवर हल्ले होत होते. पण, आता उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात सन्मान मिळत आहे. खासगी कंपन्यांच्या मुख्याधिकारी पदापासून ते शेवटच्या कामगारापर्यंत उत्तर भारतीय महाराष्ट्रात काम करीत असून महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावतात. आपल्या श्रमातून मिळवणारा पैसा ते उत्तर प्रदेश व बिहार राज्यात पाठवून तेथील विकासातही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

पश्चिम नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी गोरेवाडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून विकासाची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. नागपुरात मेट्रो आली. आरोग्य सुविधांसाठी एम्ससारख्या संस्था दिल्या आहेत. भारताविरुद्ध दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड उत्तर दिले. काश्मीरच्या विकासासाठी ३७० कलम हटवले. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतावर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली. पाकिस्तानने एक अणुबॉम्ब जरी टाकला, तरी संपूर्ण पाकिस्तान नेस्तनाबूत करू, असेही योगी म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने केवळ स्वत:चे हित साध्य करण्यासाठीच सत्ता उपभोगली आहे. स्वत:च्या परिवारातील सदस्यांचेच त्यांनी भले केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून सामान्य नागरिकांचा विचार करणारे देशात व महाराष्ट्रात सरकार असल्याचेही ते म्हणाले. उत्तर भारतीय कामगार सीईओपासून ते मजुरी करीत असतो. उत्तर भारतीय श्रमिक महाराष्ट्र व उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सेतू म्हणून काम करतात, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.