|| प्रबोध देशपांडे

election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
Jalna Lok Sabha, Raosaheb Danve, Kalyan Kale,
जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Nilesh Sambare Vanchit Bahujan Aghadi candidate in Bhiwandi Lok Sabha constituencies in Thane district
भिवंडीत तिरंगी लढत; निलेश सांबरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

भाजप, वंचितसाठी प्रतिष्ठेची निवडणूक; महाआघाडीसाठी खाते उघडण्याचे आव्हान:- विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील पाच मतदारसंघात जातीय समीकरण निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. बहुतांश मतदारसंघात दुरंगी व तिरंगी लढती होत आहेत. केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे. ‘बॅकफूट’वर असलेल्या महाआघाडीसाठी जिल्हय़ात खाते उघडण्याचे मोठे आव्हान आहे.

विधानसभा निवडणुकीची प्रचार मोहीमही शिगेला पोहोचली असून, सर्वपक्षीय नेते निवडणुकीचे मैदान गाजवत आहेत. अवघ्या सात दिवसांवर मतदान आल्याने प्रचारात जातीय राजकारणाचे रंगही चढू लागले आहेत. जिल्हय़ात पाटील, दलित, मुस्लीम, देशमुख, कुणबी, माळी, बारी, धनगर, बंजारा आदी समाजाचे गठ्ठा मतदान आहे. जातीय समीकरण लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली. आता जातीय समीकरणाची जुळवा-जुळव करून विजयाची गणित मांडली जात आहेत. अकोला पश्चिम मतदारसंघात मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान आहे. त्यामुळे आमदारकीची पाच ‘टर्म’ पूर्ण केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासमोर काँग्रेसने मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला. वंचित आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलून मदन भरगड यांना उमेदवारी दिली. अकोला पश्चिममध्ये तिरंगी लढत आहे. काँग्रेस व वंचितमध्ये दलित, मुस्लिमांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे आमदार रणधीर सावरकर व वंचित आघाडीचे हरिदास भदे यांच्यात थेट लढत आहे. लोकसभेमध्ये या मतदारसंघात केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. विकासकामे व तळागाळातील जनसंपर्कामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी पोषक समजला जात आहे. याची धास्ती घेतल्याने काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासही कुणी इच्छुक नव्हते. अनेकांनी नकार दिल्यावर नवख्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले. त्यावरूनही आरोप झाले. परंपरागत मतदानही कायम राखण्याची कसरत काँग्रेसला करावी लागेल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे, वंचित आघाडीच्या प्रतिभा अवचार आणि राष्ट्रवादीचे रवि राठी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूरमध्ये गठ्ठा मतदान कुणाच्या पारडय़ात पडते, यावर समीकरण अवलंबून राहतील. अकोट मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच झाली. वाणचे पाणी व बटालियनचे मुद्दे चांगलेच गाजले. भाजपने विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरवले. काँग्रेसकडून संजय बोडखे व वंचितकडून अ‍ॅड. संतोष रहाटे यांना उमेदवारी देण्यात आली. वंचितने माळी समाजाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांचे तिकीट कापल्याने अकोटमध्ये माळी समाजाचा उमेदवार देण्यात आला, तर काँग्रेसने माळी समाजाऐवजी बारी समाजाला संधी दिली. भारसाकळेंसाठी मुख्यमंत्र्यांनी अकोट येथे सभा घेऊन प्रचार केला. अकोटमध्ये तिरंगी लढतीचे चित्र आहे. बाळापूर मतदारसंघात सर्वच पक्षांनी नवीन उमेदवारांना तिकीट दिले. हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेसाठी, तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आला. ‘वंचित’ नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विद्यमान आमदाराचा पत्ता कट करत डॉ. धर्यवर्धन पुंडकरांना संधी दिली. शिवसेनेकडून नितीन देशमुख, राष्ट्रवादीकडून संग्राम गावंडे, तर वंचितने तिकीट नाकारल्याने डॉ. रहेमान खान एमआयएमकडून निवडणूक रिंगणात आहेत. बाळापूरमध्ये तुल्यबळ तिरंगी लढत आहे. गठ्ठा मतदानासाठी उमेदवारांची चढाओढ सुरू आहे. या ठिकाणी मराठा समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. मुस्लीम, माळी, कुणबी समाजाच्या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अकोला जिल्हय़ातील पाचही मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जातीय राजकारणाभोवती फिरत असल्याचे स्पष्ट होते.