मतदानासाठी सकाळी कमी गर्दी, दुपारनंतर मतदारांच्या संख्येत वाढ

पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा मतदारसंघांसाठी सोमवारी शांततेत मतदान झाले. मात्र संपूर्ण जिल्ह्यातच मतदानामध्ये निरुत्साह असल्याचे दिसून आले. सकाळी पडत असलेल्या पावसाचा परिणाम मतदानावर झाला. मात्र दुपारी पाऊस थांबल्याने दुपारनंतर मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. संध्याकाळी पाच वाजेनंतर अखेरच्या एका तासात मतदानासाठी केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

पालघर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज सकाळी मतदान सुरू झाले तोपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र त्यानंतर पाऊस थांबून ऊन पडल्याने मतदानामध्ये वाढ झाली. सकाळी नऊ  वाजेपर्यंत सव्वासात टक्के, अकरा वाजेपर्यंत १९ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३४ टक्के तर तीन वाजेपर्यंत ४४ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५४.७८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यतील अनेक ठिकाणी शांततेत निवडणूक पार पडली. काही तुरळक ठिकाणी ईव्हीएम यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान सुरू होण्यास काहीसा विलंब झाला, मात्र पर्यायी यंत्र उपलब्ध झाल्यानंतर मतदान सुरळीत पार पडले.

या निवडणुकीत राजकीय पक्षांमध्येही निरुत्साह दिसून आला. अनेक राजकीय पक्षांनी मतदार पावत्याच छापल्या नसल्याने त्याचा परिणाम मतदारांना भोगावा लागला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांचे क्रमांक बदलण्यात आल्याने मतदारांची गैरसोय झाली.

(वसई, नालासोपाराकरांची मतदानाकडे पाठ)

वसई आणि नालासोपारा मतदारसंघात मागील वर्षीच्या तुलनेत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. वसईच्या पश्चिम पट्टा, पूर्वेकडील ग्रामीण भाग वगळता शहरी भागातील मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी मतदारयाद्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख १९ हजार ८२ मतदार होते. त्यांच्यासाठी मतदार संघात ५०० मतदार केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. नालासोपारा येथे २४ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी या केंद्रावर विशेष सुरक्षा तैनात करणायत आली होती. तसेच मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १४ हजार ११४ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ३ हजार ९६० पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते1

नालासोपारा मतदारसंघात सोमवारी सकाळी ढगाळ वातावरणात मतदानाला सुरुवात झाली. मतदानासाठी सुटी जाहीर करण्यात आली होती. अनेकांनी सकाळी लवकर मतदान उरकून इतर बेत आखले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १३. ९ टक्के असलेले मतदान दुपारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान ३०.४२ टक्कय़ांवर पोहोचले. मात्र नंतर मतदान केंद्र रिकामी दिसू लागली.  यामुळे सकाळच्या वेळी असलेली गर्दी दुपारनंतर होताना दिसली. जेष्ठ नागरिक आणि तरुण वर्गानीही मोठा उत्साह दाखवला होता. यावेळी तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणत मतदानासाठी रांगेत उभा होता.

खासगी नोकरदारांना सुट्टी नसल्याने त्यांनी एकतर कामावर जाताना अथवा कामावरून लवकर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी मतदार सहाय्य केंद्र उभे केले असल्याने मतदारांना आपली नावे सोडणे सोपे जात होते. तसेच डिजीटल याद्या सर्व कार्यकर्त्यांच्या हातात असल्याने नावे शोधून मतदारांना दिली जात होती. सर्वच पक्षाने आपल्या मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. वृद्ध, अपंग, गर्भवती, आजारी मतदारांना व्हीलचेअर ठेवण्यात आल्या होत्या. महिलांसाठी सखी मतदान केंद्र काही ठिकाणी उभारण्यात आले होते. सकाळच्या वेळी असलेली गर्दी दुपारनंतर ओसरत गेली, ती पुन्हा वाढली नाही. विरारमधील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तसेच नालासोपारा मधील उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला.

वसई विधानसभा मतदारसंघातही मागील निवडणुकीच्या तुलनेतील उत्साह कमीच होता. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील गावात मात्र चांगेल मतदान झाले. वसई पुर्वेच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी रांगा लावून मतदान केले.