पालघर जिल्ह्यत २,१९३ मतदान केंद्रे; ४८० मतदान केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार, २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून पालघर जिल्ह्य़ातील २,१९३ मतदान केंद्रे मतदानासाठी सज्ज होणार आहेत. जिल्ह्य़ातील ३३ मतदान केंद्रे संवेदनशील असून या मतदान केंद्रांसह ४८० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग (थेट प्रक्षेपण) करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्य़ातील १९ लाख ५१ हजार ६६८ मतदार आपला हक्क बजावणार असून सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ५३ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण होत आली आहे. मतदानासाठी एकूण २,१९३ मतदान केंद्रे असून त्यांपैकी ४३ मतदान केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या मंडपांमध्ये घेण्यात येणार आहेत. या मंडपाची अग्निसुरक्षा आणि इतर सुरक्षेबाबत तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत १,१६० मतदान केंद्रे असून शहरी भागांत १,०३३ मतदान केंद्रे आहेत. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व अस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अस्थापना आणि औद्योगिक संस्था बंद ठेवणे शक्य नसल्यास त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना तीन तासांची सवलत देण्याची सूचना करण्यात आली आहे.

या निवडणुकीत १९६ मतदान केंद्रांमध्ये बदल झाले असून त्यापैकी नालासोपारामध्ये १४९, वसईत २७, बोईसरमधील १४ मतदारकेंद्रांचा समावेश आहे. या सर्व बदललेल्या मतदानकेंद्रांची माहिती ठिकठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली असून रुग्णालयात दाखल केलेल्या नागरिकांना मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेची विशेष सोय करण्यात आली असल्याची माहिती पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विक्रमगड मतदारसंघातील आठ मतदान केंद्रांवर इंटरनेटची सुविधा नसल्याने अशा ठिकाणी पोलीस वायरलेस सेट तसेच माहिती देण्यासाठी मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी व्हीलचेअर व मदतनीस यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर विशेष दक्षता

नालासोपारा येथील १९१ मतदान केंद्रांवर तर पोलिसांनी सुचवलेल्या १०० अतिरिक्त ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात काही ठिकाणी मतदारांच्या दुबार नोंदी पाहता मतदान केंद्रावर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने मान्यता केलेल्या ओळखपत्राची तपासणी करूनच नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावण्याची मुभा देण्यात येणार आहे.

साडेआठ लाखांची रोकड जप्त

आचारसंहिता पथकामार्फत तसेच राज्य उत्पादन शुल्क यांच्यामार्फत सुमारे साडेआठ लाख रुपयांची रोख रक्कम, ५४ हजार लिटर दारू, १४.५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ तसेच २९ लाख रुपयांची इतर मालमत्ता जप्त करण्यात आली असून याप्रकरणी दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सी-व्हिजील या अ‍ॅपवर ९५ तक्रारी दाखल झाल्या असून त्यांपैकी १५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यात १८ शस्त्रे व १३४ काडतूस पोलिसांनी जप्त केले.

वाहनांना जीपीएस सुविधा

मतदान साहित्याचे वितरण व पुन्हा गोळा करण्यासाठी १७० एसटी बस, ७०६ जीप-ऑटो आणि १९२ खासगी बसचा वापर करण्यात येणार असून या सर्व वाहनांना जीपीएस सुविधा बसवण्यात आली आहे. या शिवाय बेटांवर मतपेटय़ा पोचवण्यासाठी सहा बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.

१४,११४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर १४,११४ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याखेरीज ३,९६० पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ या सहा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पाच केंद्रामागे एक झोनल ऑफिसरची नेमणूक करण्यात आली असून ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास १५ मिनिटांत मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

( निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात)

प्रतिनिधी, पालघर

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून शनिवारी प्रचार थांबणार आहे. जिल्ह्यातील नालासोपारा, बोईसर, विक्रमगड व डहाणू येथे अटीतटीच्या लढती होणार असून वसईमध्येही चुरशीची लढत होणे अपेक्षित आहे.

जिल्ह्य़ातील सहा जागांपैकी युतीतर्फे शिवसेना चार तर भाजप दोन ठिकाणी निवडणूक लढवत असून महाआघाडीतर्फे बहुजन विकास आघाडी तीन जागांवर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रत्येकी एक जागेवर रिंगणात आहे. बोईसर येथे सध्या तिरंगी लढतीचे चित्र दिसून येत असून इतर सर्व मतदारसंघात प्रमुख लढत ही युती विरुद्ध आघाडी उमेदवारांमध्ये होत आहे. या निवडणुकीसाठी प्रचार शनिवारी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे.  लढतीमधील प्रमुख उमेदवार रॅली, चौक सभा व जाहीर सभांसह घरोघरी थेट मतदारांशी संपर्क करून प्रचार करत होते. आता प्रचाराचा अवधी संपल्यानंतर घरोघरी प्रचार करण्यावर भर देणार आहेत.

अटीतटीच्या लढती

नालासोपारा 

  •  क्षितिज ठाकूर   (बविआ)
  • प्रदीप शर्मा (शिवसेना)

बोईसर

  •   विलास तरे (शिवसेना)
  •  राजेश पाटील (बविआ)
  •  संतोष जनाठे (अपक्ष)

वसई

  •  हितेंद्र ठाकूर (बविआ)
  •  विजय पाटील (शिवसेना)

डहाणू

  •   पास्कल धनारे (भाजप)
  •  विनोद निकोले (माकप)

विक्रमगड :

  •  डॉ. हेमंत सवरा (भाजप)
  •  सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस)

पालघर :

  •  श्रीनिवास वनगा (शिवसेना)-
  •  योगेश नम (काँग्रेस)