मतदान यंत्रावरील राष्ट्रवादीचे चिन्ह मात्र कायम

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाल्यास शेजारच्या उल्हासनगरात त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा काँग्रेसकडून देताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार प्रवीण खरात संपर्क क्षेत्राबाहेर गेल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी संताप व्यक्त करत होते. अखेर मंगळवारी राष्ट्रवादीने आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. असे असले तरी निवडणूक यंत्रावर राष्ट्रवादीचे घडय़ाळ कायम राहणार आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाची जागा आघाडीत काँग्रेसकडे आली आहे. यापूर्वी २००९च्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. काँग्रेसकडून रोहित साळवे यांनी येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही तासांत राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवारी अर्ज प्रवीण खरात यांनीही दाखल केला. त्यामुळे अंबरनाथमध्ये आघाडीत बिघाडीची चर्चा रंगली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार शेवटपर्यंत संपर्कात आले नाहीत. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला. त्यामुळे काँग्रेसने आघाडीधर्म न पाळल्याने राष्ट्रवादीला शेजारील मतदारसंघात धडा शिकवण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर आघाडीच्या गोटात वेगाने सूत्रे हलली. मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पक्षाकडून आघाडीचा धर्म पाळला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  या वेळी काँग्रेसचे उमेदवार रोहित साळवे आणि राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल करणारे प्रवीण खरात हेही उपस्थित होते. राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी काँग्रेस आणि आघाडीच्या प्रचारासाठी उतरणार असून वेळेअभावी अर्ज मागे घेणे शक्य झाले नाही, असे या वेळी खरात यांनी सांगितले.