|| प्रथमेश गोडबोले

विधानसभा निवडणुकीनिमित्त निवडणूक आयोग, प्रशासनाकडून मतदान जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान आपले कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, असे आवाहन करत मतदान करण्याची साद सर्वाना घातली जात आहे. निवडणुकीची ही प्रक्रिया मतदारयादी तयार होत असताना म्हणजे निवडणुकीच्या आधीच सुरू झालेली असते. मात्र मतदार नावनोंदणी किंवा दुरुस्तीबाबत अद्यापही नागरिकांमध्ये पुरेशी जागृती नाही.

या विषयाबाबत पुण्यातील परिवर्तन भारत आणि निष्क ग्रुप या दोन संस्था काम करत आहेत. मतदार नावनोंदणीसाठी नागरिकांना केवळ आवाहन न करता त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याचे काम परिवर्तनचे कार्यकर्ते करत आहेत. तर, आपला लोकप्रतिनिधी नेमका कोण असावा, गेल्या निवडणुकीत काय प्रश्न होते, त्यांचे निराकरण झाले किंवा कसे? का तीच आश्वासने यंदाही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून दिली जात आहेत. यासाठी ‘तू खुलके बोल’ नावाचे अ‍ॅप निष्क ग्रुपने तयार केले आहे.

परिवर्तन भारत ही बिगरराजकीय संस्था आहे. संस्था गेल्या दहा वर्षांपासून मतदान जनजागृती करत आहे. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका अशा सर्वच निवडणुकांआधी या संस्थेकडून मतदान जनजागृती केली जाते. महाविद्यालये, विविध गृहनिर्माण संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या अशा सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जनजागृतीचे काम केले जाते.

संस्थेच्या कामांची माहिती देताना अनिकेत मुंदडा म्हणाला, ‘२००८ मध्ये महाविद्यालयीन युवकांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना एकूणच आपल्या व्यवस्थेवर बोलण्यापेक्षा स्वत: काहीतरी काम करायला हवे, या उद्देशाने ‘सुप्रशासन’ अस्तित्वात येण्यासाठी काम करण्याचे निश्चित केले. पुण्यात शिक्षण, पर्यावरण, समाज, इतिहास अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र, चांगल्या प्रशासनावर काम करणाऱ्या संस्था कमी असल्याचे लक्षात आले. लोकप्रतिनिधी निवडून देताना मतदान खूप कमी होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मतदान जनजागृतीवर काम करण्याचे पक्के केले. नाव नोंदल्यानंतर मतदार यादीत नावच येत नाही. नाव नोंदणी, दुरुस्ती याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली, केव्हा संपली याची माहितीच आमच्यापर्यंत येत नाही, अशा एक ना अनेक समस्या नागरिकांकडून समजल्या. त्यामुळे परिवर्तन संस्थेने सरकार, प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा होण्याचे ठरवले’.

सन २००९ पासून आतापर्यंत परिवर्तनने मतदान जनजागृतीचे काम सातत्याने केले आहे. चौका-चौकात मतदान जनजागृतीचे फलक घेऊन उभे राहणे, मतदारांना मतदान करण्यासाठी समाजमाध्यमातून  प्रवृत्त करणे, पथनाटय़, फ्लॅशमॉब सादर करणे, महाविद्यालये आणि सोसायटय़ांमध्ये प्रत्यक्ष जाऊन नावनोंदणीचे अर्ज भरून घेणे, असे उपक्रम केले जातात. परिवर्तनमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरी आणि व्यवसाय करणारे स्वयंसेवक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या कामाच्या, शिक्षणाच्या वेळा सांभाळून हे काम करतात. नोकरदार नागरिकांना मतदार नावनोंदणीसाठी शासकीय कार्यालयात जाऊन नोंदणी करणे शक्य नसते. त्यामुळे परिवर्तन निवडणूक आयोगासोबत जोडली गेली. सचिन जाधव या तरुणाने त्याच्या सहकाऱ्यांसमवेत ‘तू खुलके बोल’ नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. याबाबत बोलताना सचिन म्हणतो, एकाच मतदारसंघातून अनेक वर्षे एकच व्यक्ती निवडणुकीसाठी उभी असते. सध्या तर राजकीय पक्ष बदलला, तरी उमेदवार तेच ते आहेत. त्यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागात कशा प्रकारचा उमेदवार हवा इथपासून निवडून आल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीने कशा प्रकारची कामे करणे अपेक्षित आहे, हे या अ‍ॅपच्या माध्यमातून सांगता येते. आपल्या भागातील समस्या, आपले म्हणणेही मांडता येऊ शकते. या सर्व बाबी लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएस येतो आणि त्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना आपल्या प्रभागात, मतदारसंघात काय समस्या आहेत, अडचणी आहेत ते तातडीने समजते. हा प्रयोग गेल्या निवडणुकीतही केला होता, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता, असेही सचिन म्हणाला.