प्रत्येक मतदार संघात १४ टेबलवर मोजणी

औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार असून सर्वाधिक फेऱ्या सिल्लोड मतदार संघात होतील. मतमोजणीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील चार मतमोजणी केंद्रांवर दीडशे पोलीस अधिकारी आणि दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यात राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तसेच अतिशीघ्र दलाच्या दोन पथकांचा समावेश आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्राजवळ ३०० ते ४०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

मतमोजणी करताना प्रथमत: टपाली मतमोजणी केली जाईल. त्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर केले जातील. सर्वात शेवटी मतदान केंद्रातील सर्व व्हीव्हीपॅट चिठ्ठय़ातील मोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाची मान्यता घेऊनच अंतिम निकाल जाहीर केले जातील. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर मतमोजणी अधीक्षक व सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक असे तिघेजण असतील. त्याचबरोबर अधिकारी, कर्मचारी आदींसह संगणक मतमोजणी ऑपरेटर यांचा समावेश असणार आहे.  एक हजार अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीचे काम पाहतील. सिल्लोड येथील मतमोजणीत शासकीय टेक्निकल शाळा येथे होईल, तर फुलंब्री, औरंगाबादमधील तीन मतदार संघ यांची मतमोजणी औरंगाबाद शहरात होणार आहे. पोलीस वाहनांना व मतमोजणीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून कोणताही गैरप्रकार मतमोजणीदरम्यान झाल्यास त्याचे चित्रीकरण पुरावा म्हणून प्रभावीपणे वापरला जाईल, असे कळविण्यात आले आहे. साधारणत: तीन वाजेपर्यंत निकाल समजू शकतील, असा अंदाज आहे.