25 May 2020

News Flash

शहरे उदासीन; गावांत जोर!

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर पूर्व भागात असलेल्या श्रीजी कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्य़ातील मतदानाच्या टक्केवारीत घसरण; ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान टक्केवारीत जेमतेम पन्नाशीही न गाठू शकलेल्या ठाणे जिल्ह्याने यंदा मतदानाचा नवा नीचांक नोंदवला. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात ४५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदान घटण्याचे प्रमुख कारण कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरी पट्टय़ांतील नागरिकांचा निरुत्साह प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. जिल्ह्य़ात सर्वात कमी मतदान उल्हासनगर (३१ टक्के) येथे झाले असून भिवंडी ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक ५८ टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली.

ठाणे जिल्ह्य़ात रविवारपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस पडत होता. पावसाच्या सावटामुळे मतदान कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली, त्या वेळेसही जिल्ह्य़ात रिमझिम पाऊस सुरू होता. यामुळे मतदान केंद्राबाहेर एक ते दोन मतदार दिसून येत होते. मात्र, सकाळी नऊ वाजेनंतर पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर मतदान केंद्रांवर तरुणांपासून ते वृद्ध मतदारांच्या रांगा वाढू लागल्या. सायंकाळपर्यंत मतदान केंद्रांवर रांगा कायम होत्या. काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदान थांबले आणि त्यामुळे मतदान केंद्रांबाहेर रांगा वाढल्या. मात्र, त्यानंतर मतदान केंद्रांवर फारशी गजबज दिसली नाही.

ठाणे शहरातील नौपाडा तसेच आसपासच्या भागांत झालेल्या मतदानामुळे भाजपच्या गोटात समाधान होते. मात्र कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या तिन्ही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसला नाही.  सुशिक्षितांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीतील मतदारांनी पाठ फिरविल्याने या ठिकाणी ४५ टक्के मतदान झाले आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात ४३ टक्के तर भिवंडी पश्चिमेत ४८ टक्के मतदान झाले आहे. शहरी भागातील या दोन्ही मतदारसंघात कमी मतदान झाले असले तरी भिवंडी ग्रामीण मतदारसंघात मात्र ५८ टक्के इतके मतदान झाले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. या मतदारसंघात ५४ टक्के इतके मतदान झाले आहे. असे असले तरी गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ६३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये ४१ टक्के तर उल्हासनगर मतदारसंघात ३१ टक्के इतके मतदान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी सर्वात कमी मतदान झाले आहे. शहापूर मतदारसंघामध्ये मात्र ५८ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या मतदानाची टक्केवारी यंदा घसरल्याचे चित्र आहे.

ज्येष्ठ, अपंगांची परवड

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर पूर्व भागात असलेल्या श्रीजी कॉम्प्लेक्स येथील मतदान केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. त्यात दुसऱ्या मजल्यावर जाणारी उद्वाहन यंत्रणा बंद असल्याने मतदारांना दोन मजले चढून मतदान केंद्र गाठावे लागत होते. लिफ्ट बंद असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक मतदान न करता माघारी परतले. आमची इच्छा असूनही योग्य सुविधा नसल्यामुळे मतदान करू शकत नसल्याची खंत अनेक ज्येष्ठ नागरिक महिलांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत असे आदेश निवडणूक आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानंतर अनेक मतदान केंद्र स्थलांतरित करण्यात आली होती. मात्र तरीही हे केंद्र दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

ठळक घडामोडी

 •  कल्याण पश्चिमेत वीजपुरवठा बंद पडल्याने एका केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडले होते. याच भागात एका महिलेला मतदारांना पैसेवाटप करताना पोलिसांना ताब्यात घेतले.
 •  कल्याण, डोंबिवलीत बोगस मतदानाचे प्रकार घडले. बोगस मतदानानंतर खरा मतदार मतदान केंद्रावर गेल्यावर त्यानेही मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. केंद्रावरील विभागीय, निर्णय अधिकारी यांनी या मतदाराला मतदान करण्याची संधी दिली. काही केंद्रांवर अशा प्रकारचे मतदान अधिकाऱ्यांनी करू दिले नाही. साऊथ इंडियन शाळेत मदन शर्मा यांनाही असाच अनुभव आला. त्यांनी मतदान करू देण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांना तेथून हुसकावून लावण्यात आले. मढवी शाळेतही असाच बोगस मतदानाचा प्रकार घडला.
 •  मतदारांची मतदानासाठी दुपारनंतर धावपळ सुरू असताना अनेक मतदार बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुक्तपणे फिरत होते.
 •  बल्याणी येथे एकाच केंद्रावर २१०० मतदार होते. या ठिकाणी गर्दी उसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी दोन केंद्रे करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून घेतला.

‘घडय़ाळ’ सापडेना!

ठाणे शहरातील राबोडी परिसर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या मतदारसंघात राष्ट्रवादीने माघार घेऊन मनसेला साथ दिली आहे. याबाबत मात्र राष्ट्रवादीचे मतदार अनभिज्ञ असल्याने मतदान केंद्रावर घडय़ाळ तसेच हाताचा पंजा निशाणी नसल्यामुळे मतदार गोंधळल्याचे चित्र होते. अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धाव घेऊन पक्षाच्या पारंपरिक मतदारांना मनसेला साथ देण्याच्या सूचना दिल्या. तर मुंब्य्रातील मुंब्रा देवी परिसर, अमृतनगर तसेच अन्य काही ठिकाणी शिवसेनेचे बूथच दिसले नाहीत.

मतदान टक्केवारी

 • मतदारसंघ       २०१४ २०१९
 •  ठाणे   ५६.५६         ५५.९०
 • कोपरी      ५३.१०         ४९
 • माजीवाडा       ५०.३१         ४०.६०
 • कळवा- मुंब्रा    ४७.४८         ४४.०१
 • कल्याण (प.)   ४४.९२         ४५
 • कल्याण (ग्रा)   ४७.९४         ४६.३२
 • डोंबिवली       ४४.७४         ४५
 • मुरबाड          ६३.१७         ५८
 • कल्याण (पू)    ४५.१९         ३६.४०
 • शहापूर            ६५.७०         ६४.५०
 • भिवंडी (ग्रा)    ६६.२४         ५८.१९
 • अंबरनाथ        ३९.७१         ४१.३३
 • उल्हासनगर     ३८.२२         ३७.९१
 • भिवंडी (पू)      ४४.३०         ४३.८४
 • भिवंडी (प)      ४९.५८         ४८.५०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 2:22 am

Web Title: vidhan sabha election voting low percentage akp 94
Next Stories
1 मुंब्रा बाह्य़वळणावरील खड्डा नादुरुस्तच
2 दुपारनंतर मतदार घराबाहेर
3 प्रदीप शर्मा यांची मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दमदाटी
Just Now!
X