सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाची कोअर कमिटी बैठक झाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि पुरेसे संख्याबळ नसल्याने आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत १०५ जागांवर विजय मिळून आणि सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला  विरोधी बाकावर बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

निकाल लागून दोन आठवडे उलटल्यानंतरही सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता. अखेर शनिवारी (९ नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर भाजपानं सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या होत्या. रविवारी भाजपाच्या कोअर कमिटीच्या दोन बैठका झाल्या. ४ वाजता झालेल्या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याची माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना भाजपा युतीला जनादेश दिला होता. सोबत काम करण्यासाठी हा कौल होता. मात्र, शिवसेनेनं भाजपासोबत सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. आम्हाला जनादेशाचा अपमान करायचा नव्हता. त्यामुळं आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करणार नसल्याचं सांगितलं आहे,” असं पाटील म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीत २८८ जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या. त्यांचा मित्रपक्ष शिवसेने यांनी मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षे दावा सांगत सत्तास्थापनेत सामील होण्यास नकार दिला. जोवर मुख्यमंत्रीपदावर चर्चा करत नाही, तोवर पुढील काहीही चर्चा करायची नाही असा शिवसेनेचा पवित्रा होता. त्याच पवित्र्यावर ठाम राहिल्यामुळे अखेर भाजपची कोंडी झाली आणि सर्वात मोठा पक्ष होऊनही त्यांचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले.