भाजपने हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदार संघातून ‘टिक-टॉक’ स्टार सोनाली फोगट हिला विधानसभा निवडणुकीचे तिकिट दिले आहे. सोनालीला भाजपने दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात आदमपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

सोनालीला भाजपाकडून तिकिट जाहीर झाल्यानंतर तिने विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘माझे सगळे फॉलोअर्स मला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी कधी एकदा उमेदवारीचा अर्ज भरते याचीच ते वाट पहात आहेत. माझ्या पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नक्कीच विजयी होऊ’, असे ती म्हणाली.

दरम्यान, भजनलाल यांनी तीन वेळा हरियाणाचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते. तसेच हिसार जिल्ह्यांत येणारा आदमपूर मतदारसंघ हा भजनलाल कुटुंबाचा गड मानला जातो. भजनलाल कुटुंबाच्या एकाही सदस्याचा या मतदारसंघातून अद्याप पराभव झालेला नाही. दुसरीकडे सोनाली ही टीक-टॉक स्टार आहे. तिचे टिक-टॉकवर एक लाखांपेंक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. राजकारणात येण्यापूर्वी सोनाली ही अभिनेत्री होती. तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. पण टिक-टॉकमुळे ती अधिक चर्चेत आली.

सोनालीच्या विरोधात असलेले कुलदीप बिश्नोई हे देखील या मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुलदीप बिश्नोई यांचा मोठा विजय झाला होता. पण सोनालीचा टिक-टॉकवर मोठ्या प्रमाणात तिचा चाहता वर्ग आहे. तशातच ती टिक-टॉकवर रोज नवनवीन व्हिडीओ बनवत असते. अशा परिस्थितीत सोनालीचा चाहता वर्ग तिला मतदानाच्या वेळी किती पाठिंबा देतो हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

हरियाणातील ९० विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी २४ ऑक्टोबरला होणार आहे.