|| अविनाश कवठेकर

हडपसर विधानसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची ताकद असली, तरी येथील मतदारांचे शिवसेना, भाजप उमेदवाराला समर्थन राहिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. मात्र राष्ट्रवादी आणि मनसेकडून चांगली लढत दिली जात असल्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरली आहे.

या मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे गटनेता वसंत मोरे रिंगणात आहेत. गेल्या वेळी सुद्धा हेच उमेदवार होते. त्यात योगेश टिळेकर यांनी विजय प्राप्त केला. मतदार संघातील कात्रज आणि काही भागांमध्ये मनसेचीही ताकद आहे. मात्र आतापर्यंत सेनेचे महादेव बाबर आणि त्यानंतर योगेश टिळेकर हे या मतदार संघातून विजयी झाले आहेत.

जागा वाटपात शिवसेनेला हा मतदार संघ मिळू न शकल्यामुळे त्या पक्षात बंडखोरी झाली होती. मात्र बंडोबांना शांत करण्यात आले. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. माजी आमदार महादेव बाबर हे नाराज असून ते प्रचारापासून लांब आहेत. मात्र एका गटाकडून टिळेकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदार संघ गेल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते-पदाधिकारी नाराज आहेत. भाजपला रोखण्यासाठी या वेळी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले होते. त्याचा कितपत फायदा होईल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

शिरूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या शहरातील विविध भागांचा हडपसर या विधानसभा मतदार संघात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महापालिकेतील सत्तेच्या वेळी महापौर आणि उपमहापौर ही महत्त्वाची पदे याच मतदार संघात बहुतांशवेळी राहिली. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या मतदार संघातील प्रचारसभाही मोठय़ा संख्येच्या झाल्या होत्या. मात्र या मतदार संघातून कोल्हे यांना मताधिक्य घेता आले नाही. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी ५ हजार ३७० मतांची निसटती आघाडी येथून घेतली, ही बाबही येथील मतदारांचा कौल स्पष्ट करणारी आहे.