विधानसभा उमेदवारी अर्ज भरण्याची लगीनघाई

जिल्ह्य़ातील सर्वच्या सर्व १५ मतदारसंघांत प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह, बंडखोर, अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी गुरुवारचा मुहूर्त साधल्याने बहुतांश ठिकाणी उमेदवार, नेते, कार्यकर्त्यांची गर्दी झाली. कुठे जोरदार शक्ती प्रदर्शन झाले, तर कुठे मित्रपक्षाने अंतर राखल्याने अधिक गाजावाजा न करता शांततेत अर्ज भरण्यावर उमेदवारांनी भर दिला. मालेगावमध्य मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार बैलगाडीवर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी आला.  महायुतीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन टाळले. यामागे पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरांचा आव्हान, अशी काही कारणे असण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार हा अंतिम दिवस आहे. तत्पूर्वी, अर्ज भरण्याकडे अनेकांचा कल राहिल्याने बहुतांश मतदारसंघात अर्ज भरण्यासाठी लगीनघाई सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत धावपळ नको, या विचारातून अनेकांनी गुरुवारचा मुहूर्त साधला. अर्ज भरण्यासाठी केवळ उमेदवारासह पाच जणांना प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगितले गेले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती. महायुतीतर्फे नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, इगतपुरी मतदारसंघातून निर्मला गावित यांनी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केले नाही. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ स्मार्ट रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी मार्गावरून वाहतूक होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी येणाऱ्यांमुळे कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. महायुतीचे शेकडो कार्यकर्ते हुतात्मा स्मारक परिसरात जमले होते.

देवळाली मतदारसंघात महायुतीचे योगेश घोलप यांनी तर इगतपुरी मतदारसंघात काँग्रेस आघाडीतर्फे हिरामण खोसकर यांनी अर्ज दाखल केला. खोसकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे आदी उपस्थित होते. खोसकर यांनी शक्ती प्रदर्शन टाळले. उमेदवार प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन अर्ज भरण्यास गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गर्दी केली. गर्दीमुळे एकेरी मार्गावरील वाहतुकीत वारंवार अडथळे आले.

मालेगाव मध्यमधून आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेसतर्फे तर माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांनी एमआयएमतर्फे अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना उभयतांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आसिफ शेख यांनी शहर काँग्रेस कार्यालयापासून प्रांत कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. त्यांचे प्रतिस्पर्धी मौलाना मुफ्ती यांनी मुशावरात चौकापासून पदयात्रा काढली. या यात्रेच्या अग्रभागी सामील असलेल्या बैलगाडीवर मौलाना हे स्वार झाले होते. शहरातील सर्व रस्ते अत्यंत खराब झाल्याने पायी चालणे मुश्कील झाल्याने त्यांनी बेलगाडीतून येत अर्ज दाखल केल्याचे त्यांच्या निकटवर्तीनी नमूद केले. मालेगाव मध्य मतदारसंघात चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत थोडय़ा फार फरकाने ही स्थिती होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पुन्हा गर्दी होण्याचा अंदाज आहे.

सरोज अहिरे यांची बंडखोरी

देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली. भाजपचे प्रदेश पदाधिकारी वसंत गिते यांनी नाशिक मध्यमधून   काँग्रेस आघाडीकडून रिंगणात उतरण्याचे संकेत दिले होते. परंतु, वरिष्ठ नेत्यांनी त्यांची नाराजी दूर केल्याचे दिसते.  या मतदारसंघात काँग्रेसन नगरसेवक शाहू खैरे यांना पुन्हा तिकीट दिले आहे. भाजपच्या वाटय़ाच्या नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा गुरुवारी दुपापर्यंत मिटलेला नव्हता. आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव दुसऱ्या यादीतही नव्हते.  नाशिक पश्चिममध्ये भाजप नगरसेवक दिनकर पाटील, शिवसेना नगरसेवकांचा गट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे.

अपूर्व हिरेंची अपक्ष उमेदवारी

नाशिक पश्चिम मतदारसंघात काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर बसलेल्या अपूर्व हिरे यांना गुरुवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. आघाडीत या जागेवर माकपने हक्क सांगितला आहे. तो घोळ अद्याप मिटलेला नसल्याने आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीत ही जागा कोणाला मिळेल हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले. ही जागा आघाडीने माकपला दिली आहे. काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. डी. एल. कराड शुक्रवारी अर्ज भरणार आहेत.