एका दिवसावर असलेली विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यातील ४७० गावांनी ग्रामसभा व गवसभा घेतली. यात निवडणुकीदरम्यान दारूचा वापर होऊ देणार नसल्याचे ठराव पारित करण्यात आले. तसेच दारू न पिता मतदानाचा निर्धार लोकांनी केला आहे. याशिवाय या लढ्यात महिलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक काळात नवऱ्याला दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मत देणार नसल्याची ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे.

या लढय़ात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक काळात पुरूषांना दारूचे आमिष दिले जाते. याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होतो. सोबतच गावातील दारूबंदी प्रभावित होते. त्यामुळे नवऱ्याला दारू पाजणाऱ्या उमेदवाराला मत देणार नसल्याची ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे. जिल्ह्यात दारूबंदीसाठी २०१६ पासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मुक्तिपथ अभियान सुरू केले. याअंतर्गत जिल्हय़ातील ६०० गावांनी दारूविक्री बंद केली आहे. पण निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार घडतो. विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी एक मोहीम मुक्तिपथ अभियानाद्वारे सुरू करण्यात आली. या अंतर्गत तब्बल ४७० गावांनी ठराव पारित केले.

प्रचारादरम्यान गावात दारू वाटप होऊ देणार नाही तसेच मतदान दारूच्या नशेत करणार नाही असे ठराव सभेत पारित करण्यात आले. गावागावांमध्ये रॅली काढून आपले अमूल्य मत विकू नका, निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प करा, ज्याला दारूबंदी नको तो आमदार आम्हाला नको अशा घोषणा देत स्वयंसेवक व नागरिकांनी जनजागृती केली.

ठराव घेणारी गावे-
जिल्ह्य़ातील १२ तालुक्यातील ४७० गावांनी दारुमुक्त निवडणुकीचा निर्धार केला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील ५४, देसाईगंज १९, एटापल्ली ७७, सिरोंचा ५२, कुरखेडा २८, धानोरा ३५, गडचिरोली ६४, मुलचेरा १७, आरमोरी ३४, कोरची २६ आणि भामरगड तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे.