सोलापुरात रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम पहिल्या दोन तासांच्या मतदानावर झाल्याचं पाहायला मिळालं. सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये केवळ ३.५७ टक्केच मतदान नोंदविले गेले होते. परिणामी पहिल्या दोन तासात कमी मतदान झाल्याचे सर्वच केंद्रावर दिसून आले. रात्रभर झालेल्या पावसामुळे काही मतदान केंद्रांमध्ये तर बऱ्याच मतदान केंद्रांबाहेरही पाणी साठले होते. या पाण्यातून वाट काढीत मतदारांनी मतदान केले.

आणखी वाचा- पालघर : वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, दोन तासात एकही टक्का मतदान नाही

मतदारांसोबतच निवडणूक अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. सात वाजता मतदानाला सुरूवात झाली त्यावेळी मोजक्याच मतदारांनी छत्री, रेनकोटच्या आधाराने मतदान केंद्र गाठले. शहरातील बहुतांश मतदान केंद्रात अद्यापही पाणी असल्याची माहिती आहे. दरम्यान, आता पाऊस थांबला असून मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडत असून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील बहुतांश केंद्रावर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे ३४ लाख ३४ हजार ५४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अकरा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या ७० उमेदवारांसह एकूण १५४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ५२१ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १९ हजार २५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.