राज्यात २८८ विधानसभेच्या जागांसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत असून सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झालीये. साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत आहेत. निवडणूक तोंडावर आली असताना उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून राष्ट्रवादीकडून नरेंद्र पाटील हे रिंगणात आहेत.

दरम्यान, सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर सकाळीच उदयनराजे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर उदयनराजेंनी आज सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बोलताना त्यांनी, “विजयाचा मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे, यश मिळेलच” असा विश्वास व्यक्त केला.  “साताऱ्याच्या जनतेनं मला  भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या ऋणातून मी कधीही मुक्त होणार नाही. मला जनतेसाठी काम करायचंय. त्यामुळेच मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे. यश मिळेलच” असं उदयनराजे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्यात ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.