27 May 2020

News Flash

उस्मानाबाद : विद्यमान चारपैकी दोन आमदारांवर येणार पराभवाची वेळ 

राजकीय समीकरणातील बदल; उमद्या नेतृत्वाला फटका

– रवींद्र केसकर

राज्याच्या विधीमंडळात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या तब्बल नऊ एवढी आहे. जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदार संघ आहेत. मात्र जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींची संख्या मतदार संघांच्या दुप्पट आहे. विधान परिषदेतील काही लोकप्रतिनिधी थेट उस्मानाबाद जिल्ह्याशी निगडीत असल्यामुळे त्याचा जिल्ह्याच्या अनेक बाबीत सकारात्मक लाभ होत आला आहे. पक्षांतरामुळे बदललेल्या राजकीय समीकरणाचा जिल्ह्यातील नेतृत्वाला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. परिणामी विकासात्मक भूमिका सभागृहात अत्यंत आग्रहाने मांडणार्‍या चारपैकी दोन लोकप्रतिनिधींवर यंदाच्या निवडणुकीत घरी बसण्याची वेळ येणार आहे.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर एक मतदार संघ गमवावा लागला. पाच विधानसभा मतदार संघावरून जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ शिल्लक राहिले. जिल्ह्याच्या वाट्याला येणारे हक्काचे एक लोकप्रतिनिधीत्व कमी झाले. विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण, भाजपवासी झालेले राणाजगजितसिंह पाटील, सेनेचे ज्ञानराज चौगुले आणि राष्ट्रवादीचे राहुल मोटे हे चार लोकप्रतिनिधी आहेत. त्याव्यतिरिक्त भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, औश्याचे काँग्रेस आमदार बसवराज पाटील, यवतमाळचे सेनेचे तानाजी सावंत, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे या पाच लोकप्रतिनिधींचा जिल्ह्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा संपर्क आहे. असे एकूण नऊजण विधीमंडळात उस्मानाबाद जिल्ह्याची बाजू आग्रहाने मांडत आले आहेत. नव्या राजकीय समीकरणामुळे या संख्येवर आता कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री आमदार मधुकर चव्हाण यापूर्वी चारवेळा निवडून आले आहेत. ही त्यांची पाचवी निवडणूक आहे. सलग तीनवेळा निवडून येत त्यांनी हॅट्ट्रीक साजरी केली आहे. आता सलग चौथ्या विजयासाठी ते सज्ज झाले आहेत. त्यांच्यासमोर भाजपाने राष्ट्रवादीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आव्हान उभे केले आहे. यापूर्वी राणाजगजितसिंह पाटील यांचे वडिल डॉ. पद्मसिंह पाटील आणि मधुकर चव्हाण यांनी एकवेळा एकमेकांसमोर दंड थोपटले आहेत. त्यावेळी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मधुकर चव्हाणांचा पराभव केला होता. आता वडिलांपाठोपाठ राणाजगजितसिंह पाटील देखील मधुकर चव्हाणांचा पराभव करणार? की मागे झालेल्या आपल्या पराभवाचा वचपा काढण्यात चव्हाण यशस्वी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक मात्र नक्की, या दोन्ही मातब्बर नेतृत्वापैकी एकाला पराभूत होवून घरी बसावे लागणार आहे. जिल्ह्याच्या दृष्टिने हे दोन्ही नेते मोठे योगदान देत आले आहेत. भविष्यातील अनेक योजना यांच्या कल्पक आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जाणार आहेत. मात्र दुर्दैवाने या दोघांपैकी एकालाच सभागृहात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करावे लागणार आहे. ऐनवेळी राजकीय घडामोडींमुळे आश्चर्यकारक बदल झाल्यास तिसरा नवीन चेहरा देखील तुळजापुरातून समोर येण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे दोन अनुभवी उमद्या नेतृत्वाला जिल्ह्यातील जनतेला मुकावे लागणार आहे.

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदार संघात विजयाची हॅट्ट्रीक साजरी केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे मोठ्या आत्मविश्वासाने मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांच्या विजयाचा अश्वमेघ रोखण्याची जबाबदारी शिवसेनेने लक्ष्मीपुत्र तानाजी सावंत यांच्यावर सोपविली आहे. तानाजी सावंत सध्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. भूम-परंडा-वाशी मतदार संघातून राष्ट्रवादीचे मोटे आणि सेनेचे तानाजी सावंत यांच्यात कडवी लढत होणार आहे. या लढतीत एका विद्यमान आमदाराला पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे स्वतःच्या संघर्षातून जिल्ह्याच्या महत्वपूर्ण प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार्‍या एका आमदारावर घरी बसण्याची वेळ येणार आहे.

उस्मानाबादमध्ये नव्या नेतृत्वाचा उगम
तुळजापूर आणि भूम-परंडा-वाशी मतदार संघात निर्माण झालेली कोंडी जुन्या जाणत्या नेतृत्वाला अडचणीत पकडणारी आहे. तर दुसरीकडे उस्मानाबादमध्ये स्वतःचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांसाठी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तब्बल चार दशकानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या परिवारातील व्यक्ती उस्मानाबाद मतदार संघाबाहेर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे समोर तुल्यबळ स्पर्धक नसल्यामुळे उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून नव्या नेतृत्वाचा उगम होण्याची शक्यता आहे. हे नवे नेतृत्व कोण ? यावरून मात्र सध्या समाजमाध्यमात मोठा गोंधळ सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 3:09 pm

Web Title: vidhansabha election osmanabad district politics analysis bloh by ravindra kesakar nck 90
Next Stories
1 BLOG: खरंच गांधींमुळे भारताची फाळणी झाली होती का?
2 BLOG: आदित्यभाई ‘केम छो’ ?
3 BLOG : ‘अशांत’ राज ठाकरे शांत का?
Just Now!
X