News Flash

ईशान्य मुंबईत युतीला आव्हान

गेल्या पाच वर्षांमध्ये येथील आमदार पायाभूत सुविधा पुरवण्यासोबत प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.

|| जयेश शिरसाट

 पायाभूत सुविधा पुरवण्यास लोकप्रतिनिधी अपयशी:- प्रतिस्पर्धी दुबळे असले तरी ईशान्य मुंबईतील सहा विद्यमान आमदार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना विधानसभा निवडणूक सोपी नसेल. गेल्या पाच वर्षांमध्ये येथील आमदार पायाभूत सुविधा पुरवण्यासोबत प्रमुख प्रश्न मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यातच पक्षांतर्गत विरोधक, संभाव्य बंडखोरी आणि गटबाजी लक्षात घेता येथील लढती अगदीच एकतर्फी होण्याची शक्यता नाही. सेना-भाजप युती न झाल्यास त्या अधिक रंजक, अटीतटीच्या होतील. येथे भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिम हे मराठमोळे मतदारसंघ आहेत. मनसेच्या आधी येथे शिवसेनेची भक्कम बांधणी होती. मात्र मनसेने हे तिन्ही मतदारसंघ काबीज करत ती खिळखिळी केली. २०१४ मध्ये मोदी लाटेने युतीच्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या संजय पाटील यांचा पराभव केला. यावेळी मनसेने निवडणूक न लढता मोदींना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. आता मनसे लोकप्रियतेच्या उतरंडीवर असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरल्याने मनसे मानखुर्द वगळता उर्वरित पाच मतदारसंघांमध्ये मराठी मतांचे विभाजन करू शकेल.

ईशान्य मुंबई :- मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द-शिवाजीनगर

भांडुप पश्चिम

भांडुप ही औद्योगिक वसाहतींमधील कुशल-अकुशल श्रमिकांनी निर्माण केलेली वस्ती. इथला बहुतांश मतदार बैठय़ा चाळींमध्ये वास्तव्य करतो. लालबहाद्दूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा विखुरलेले कारखाने बंद पडल्याने त्या जागेत टोलेजंग गृहसंकुले उभी राहिली. हा मराठी विशेषत: कोकणी मतदारसंघ आहे. येथे शिवसेनेचे अशोक पाटील आमदार आहेत. मात्र महापालिका निवडणुकीत ते वास्तव्यास असलेल्या प्रभागातून त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या. पोटनिवडणुकीतही त्या पडल्या. या पाश्र्वभूमीवर विभागप्रमुख, माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर भांडुपमधून उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीत आयत्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांना भाजपने गळ घातली होती. मात्र तो मोह झुगारून ते सेनेतच राहिले. काँग्रेसतर्फे  नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. मनसेतर्फे विभाग अध्यक्ष रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

समस्या

 • संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात प्रत्येक लोकप्रतिनिधी अपयशी
 • रखडलेल्या झोपू प्रकल्पांकडे दुर्लक्ष
 • सुसज्ज रुग्णालय नसल्याने होलपट
 • पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल नसल्याने मुलुंड, विक्रोळीला वळसा घालून प्रवास
 • एकही मैदान नाही
 • अरुंद रस्त्यांमुळे सदैव वाहतूक कोंडी

मुलुंड

पूर्वेला मराठी तर पश्चिमेला गुजराती वस्ती असलेल्या मुलुंडमध्ये गेल्या २० वर्षांंपासून भाजपचे सरदार तारसिंह आमदार आहेत. भाजपसाठी शहरात सुरक्षित मतदारसंघांमध्ये मुलुंडची गणना होते. गेल्या निवडणुकीत वय या एका मुद्दय़ावरून त्यांच्याऐवजी नव्या दमाचा उमेदवार द्यावा हा विचार पक्षातील नेत्यांना शिवला. विनोद तावडे येथून लढणार अशीही चर्चा सुरू झाली आणि सरदार यांनी मातोश्री गाठले. परिणामी त्यांच्या उमेदवारीवर बळेच शिक्कामोर्तब झाले. शिवसेना सोबत नसताना आणि काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी असे तीन प्रतिस्पर्धी रिंगणात असताना सरदार तब्बल ६५ हजार इतक्या मताधिक्याने विजयी झाले. भाजपच्या पारंपरिक मतांसोबत मवाळ स्वभाव, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीची धावपळ हे सारदार यांच्या विजयाचे गमक.  मात्र वाढत्या वयासोबत खालावलेली प्रकृती, पक्ष बांधणीत आलेली मरगळ ही त्यांची पडती बाजू. तसेच मुख्य प्रश्न सोडवण्याऐवजी  नगरसेवकाच्या अखत्यारीतील कामे करण्यावर सरदार यांचा भर. या पाश्र्वभूमीवर भाजपमधील अनेक पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.

समस्या

 • राष्ट्रीय उद्यानातील झोपडीधारकांचे रखडलेले पुनर्वसन
 • पूर्व भागातून आत-बाहेर करण्यासाठी एकच मार्ग
 • पूर्व भागात पेट्रोलपंपची व्यवस्था नाही. पेट्रोलसाठी पश्चिमेकडे धाव घ्यावी लागते.
 • पागडी प्रकारातील इमारतींमधील मालक-भाडेकरू वाद

विक्रोळी

आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वस्ती अशी ओळख असलेल्या विक्रोळीत मराठी, बहुजन मतदारांचे प्राबल्य आहे. शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ २००९ मध्ये मनसेने कब्जात घेतला. येथून मंगेश सांगळे निवडून आले होते. मात्र २०१४ च्या लढतीत सेनेच्या सुनील राऊत यांनी विक्रोळीत विजय मिळवला. या लढतीत भाजपने ही जागा रिपाइंसाठी सोडली होती. रिपाइंतर्फे विवेक पंडित येथे लढले. काँग्रेसचे संदेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे संजय पाटील, मनसेचे सांगळे रिंगणात होते. पराभवानंतर सांगळे भाजपत आले. मात्र महापालिका निवडणूक हरले.

समस्या

 • म्हाडा इमारतींचा रखडलेला पुनर्विकास
 • रखडलेला पूर्व-पश्चिम उड्डाण पूल
 • महात्मा फुले रुग्णालयाची दुरवस्था
 • भिजत पडलेला कचराभूमी प्रकल्प

घाटकोपर पूर्व

गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे प्रकाश मेहता आमदार आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग या मतदारसंघाचे आर्थिक, सामाजिक या दोन मुद्दय़ांवर विभाजन करतो. रस्त्याच्या एका बाजूला गुजराती, जैन समाजाची श्रीमंत वस्ती. ज्यात शहरातील बडे उद्योजक, व्यावसायिक राहतात. तर दुसऱ्या बाजूला रमाबाई, कामराजनगर ही बहुजनांची गरीब वस्ती. पारंपरिक मतदार आणि दुबळे प्रतिस्पर्धी ही जमेची बाजू सोडल्यास वाहतूक कोंडी, शाळांची मर्यादित संख्या, रखडलेले झोपू प्रकल्प अशा विविध कारणांमुळे येथील नागरिक नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर मेहता यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना जनतेच्या विरोधी मानसिकतेला सामोरे जावे लागेल, असा अंदाज आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून ३८ पदाधिकारी इच्छुक आहेत. नगरसेवक प्रग शहा, पक्षांतर केलेले प्रवीण छेडा, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट ही या यादीतील प्रमुख नावे.

गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे प्रकाश मेहता आमदार आहेत. पूर्व द्रुतगती मार्ग या मतदारसंघाचे आर्थिक, सामाजिक या दोन मुद्दय़ांवर विभाजन करतो. रस्त्याच्या एका बाजूला गुजराती, जैन समाजाची श्रीमंत वस्ती. ज्यात शहरातील बडे उद्योजक, व्यावसायिक राहतात. तर दुसऱ्या बाजूला रमाबाई, कामराजनगर ही बहुजनांची गरीब वस्ती. पारंपरिक मतदार आणि दुबळे प्रतिस्पर्धी ही जमेची बाजू सोडल्यास वाहतूक कोंडी, शाळांची मर्यादित संख्या, रखडलेले झोपू प्रकल्प अशा विविध कारणांमुळे येथील नागरिक नाराज आहेत. या पाश्र्वभूमीवर मेहता यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना जनतेच्या विरोधी मानसिकतेला सामोरे जावे लागेल, असा अंदाज आहे. त्यामुळेच या मतदारसंघातून ३८ पदाधिकारी इच्छुक आहेत. नगरसेवक प्रग शहा, पक्षांतर केलेले प्रवीण छेडा, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट ही या यादीतील प्रमुख नावे.

घाटकोपर पश्चिम

डोंगर खोदून निर्माण झालेल्या वस्त्यांनी बनलेला हा मतदारसंघ. येथे दोन वेळा राम कदम निवडून आले. कदम पहिल्या वेळी मनसेतून तर दुसऱ्या वेळी भाजपमधून लढले. या दहा वर्षांमध्ये त्यांनी देवदर्शन, रक्षाबंधन या उपक्रमांतून मतदार जोडले. पण मतदारांना कायम फायदा होईल अशा समस्या मात्र कायम राहिल्या. यंदा तेच मुद्दे घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी रिंगणात उतरणार आहेत.

समस्या

 • पाणी हा येथील ज्वलंत प्रश्न आहे. डोंगराळ भागातील वस्त्या पाण्याच्या टाक्यांवर अवलंबून आहेत. या टाक्यांचे नियमन खासगी व्यक्तींच्या संघांकडे आहे.
 • रस्ते अरुंद आहेत. पश्चिम उपनगरे जोडणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही.
 • रुग्णालयाची दुरवस्था आहे.
 • पुनर्वसन प्रकल्प रखडलेले आहेत

समस्या

 • पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य सुविधांची वानवा
 • देवनार कचराभूमीला सतत लागणारी आग, प्रदूषण, रोगराई
 • जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पामुळे प्रदूषणात वाढ
 • घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल, भूमिगत मार्ग नसल्याने अपघातांत वाढ

मानखुर्द-शिवाजीनगर

धारावीपेक्षा मोठी आणि गलिच्छ झोपडपट्टी, अशी या मतदारसंघाची ओळख. खाडी बुजवून देवनार क्षेपणभूमीला भिडलेल्या अवैध वस्त्या, पाणी-वीज या मूलभूत गरजा झोपडीदादा आणि विविध सुविधा अवैधरीत्या पुरवणाऱ्या टोळ्यांवर अवलंबून आहेत.  रस्ते, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या आणि अशा पायाभूत सोयी-सुविधांमध्ये हा मतदारसंघ मागे आहे. या मतदारसंघात मुस्लीम लोकवस्ती सर्वाधिक आहे. बौद्ध, चर्मकार आणि मातंग समाजही येथे मोठय़ा संख्येने राहतो. प्रमुख राजकीय पक्षांसोबत गट, समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मुस्लीम मतांच्या जोरावर समजवादी पक्षाचे अबू आझमी येथे सातत्याने निवडून येतात. यंदा येथे समाजवादीचे पाच नगरसेवक आहेत. गेल्या विधानसभा लढतीत शिवसेनेच्या सुरेश तथा बुलेट पाटील यांनी कडवी झुंज दिली. नऊ  हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. येथील उत्तर भरतीय मते लक्षात घेता भाजपसोबत युती असती तर कदाचित चित्र वेगळे असते. लोकसभा लढतीत आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणाऱ्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही चुणूक दाखवली. योग्य उमेदवार दिल्यास येथील लढत बहुरंगी होईल, अशी शक्यता आहे.

मतदार म्हणतात,

रमाबाईनगर, कामराजनगर, नित्यानंदनगर अशा घाटकोपर पूर्व मतदारसंघातील वस्त्या जशाच्या तशाच आहेत. तिथे विकास झालेला नाही. प्रकाश मेहता सहा वेळा इथले आमदार झाले. त्यापैकी यंदाची पाच वर्षे त्यांच्या पक्षाची सत्ता होती. स्वत: ते गृहनिर्माणमंत्री होते. पण त्यांच्याच मतदारसंघात अनेक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. सुरुवातीला मेट्रो पूर्व द्रुतगती मार्गावरून जाणार होती. त्याचा फायदा रमाबाई, कामराजनागरसह अन्य वस्त्यांना झाला असता. नंतर हा मार्ग बदलून गारोडियानगर येथून वळवण्यात आला. बेस्ट आगाराजवळील तलावाचे काम रखडले. तरण तलाव बंद आहे. आंबेडकर उद्यानातील पूर्णाकृती पुतळा अद्याप बसवलेला नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. – अ‍ॅड. हर्ष साळवे,घाटकोपर पूर्व

पायाभूत सोयी-सुविधांबाबत बोंब आहेच. पण भांडुपमधील कळीचा मुद्दा येथील वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. अल्पवयीन विद्यार्थी संघटित गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सक्रिय होऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत. त्याला पायबंद घालण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधींकडून हालचाली झालेल्या नाहीत.- रमेश खानविलकर,

परीक्षा परिषद सदस्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:37 am

Web Title: vidhansabha election representatives infrastructure akp 94
Next Stories
1 वृक्षारोपण आणि पुनर्रोपणाच्या पद्धतीवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2 मित्रपक्षांना जागा देण्याची शिवसेनेची तयारी
3 बेस्ट कर्मचाऱ्यांसमोरही आर्थिक चिंता
Just Now!
X