एजाजहुसेन मुजावर, सोलापूर

माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वत करीत भाजपसाठी मोठी कामगिरी केलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी यंदाच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल धोक्याची घंटा दर्शविणारा आहे. त्यांची स्वत:च्या माळशिरसमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मते पथ्यावर पडल्यामुळेच भाजपला निसटता विजय मिळविता आला. शेजारच्या माढय़ात राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्यात त्यांचे बंधू संजय शिंदे हे दोघे मोहिते-पाटील विरोधक निवडून आले. मोहिते-पाटील गटाचे शिवसेना बंडखोर आमदार नारायण पाटील यांचा करमाळ्यात झालेला पराभव त्यांच्यासाठी धक्कादायक ठरला आहे.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडाफोडीवरुन अमित शाह यांना टोला, देवेंद्र फडणवीसांना म्हणाले ‘चेलेचपाटे’
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Buldhana lok sabha
बुलढाणा : नरेंद्र खेडेकर-हर्षवर्धन सपकाळ यांच्यात दिलजमाई; आधी मैत्रीपूर्ण लढतीचे ट्विट आता फक्त मैत्री
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान

गेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघासह लगतच्या मतदार संघांमध्ये भाजपच्या विजयासाठी मोहिते-पाटील यांनी मोठी कामगिरी बजावली होती. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. दोन्ही काँग्रेसंमधून बरेच प्रस्थापित नेते भाजप वा शिवसेनेत दाखल झाले होते. माढा लोकसभा निवडणुकीत तर स्वत:च्या माळशिरस तालुक्यातून भाजपला एका लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धारही मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला होता. त्यानंतर आता अवघ्या तीन महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विपरीत चित्र दिसून आले.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस राखीव जागेवर मोहिते-पाटील यांची ताकद पाहूनच राम सातपुते यांना रिंगणात उतरविले. मोहिते-पाटील यांनी सातपुते यांना ७१ हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार बोलून दाखविला होता. दुसरीकडे सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीने मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर यांना उभे केले असता त्यांच्यासाठी शरद पवार अजित पवार यांनी माळशिरस भागात प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे ही लढत सातपुते व जानकर यांच्यापेक्षा शरद पवार व मोहिते-पाटील यांच्यातच खऱ्या अर्थाने होती. मतमोजणी सुरू झाली तेव्हा जानकर यांनी पंधरा फे ऱ्यांपर्यंत १५ हजारांपर्यंत मतांची आघाडी घेतली होती. शेवटच्या क्षणात त्यांचे मताधिक्य कसेबसे तुटले आणि अखेर अडीच हजारांच्या अल्पशा मताधिक्य घेऊन सातपुते हे विजयी झाले. तेव्हा मोहिते-पाटील गटासह भाजपला हायसे वाटले. माळशिरस मतदार संघाच्या इतिहासात आतापर्यंत मोहिते-पाटील यांना किंवा त्यांनी उभे केलेल्या उमेदवाराला एवढी कमी मतांची आघाडी कधीही मिळाली नव्हती. त्यामुळे  स्वत:च्या घरात त्यांना ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते.

दरम्यान, शेजारच्या करमाळा मतदार संघातही मोहिते-पाटील गटाची पीछेहाट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मोहिते पाटील यांचे समर्थक तथा सेनेचे बंडखोर आमदार नारायण पाटील यांचाही करमाळय़ात पराभव झाला आहे. हा पराभव मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक संजय शिंदे यांनी केला आहे.

माढय़ातही निष्प्रभ

माढय़ातही मोहिते पाटील फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. तिथेही मोहिते यांचे अन्य एक विरोधक बबनराव शिंदे यांनी विजय मिळवला आहे. माळशिरसला लागून असलेल्या इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांनीही मोहितेंच्या सल्ल्यानेच काँग्रेसची साथ सोडत भाजपप्रवेश केला. परंतु इंदापूरमध्येही हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव देखील मोहिते-पाटील यांच्यासाठी धक्का देणारा असल्याचे मानले जाते. मोहिते-पाटील गेले अनेक दिवस पवारांच्या विरोधात शक्ती पणाला लावत होते. त्याच ठिकाणी आता पवार हे मोहिते पाटलांच्या विरोधात सर्वशक्तीनिशी उतरल्याचे दिसत आहे.