लातूर ग्रामीण मतदारसंघ सेनेला सोडल्याने आश्चर्य

प्रदीप नणंदकर, लातूर</strong>

लातूर म्हणजे विलासराव देशमुख हे समीकरण रूढ झालेले. विलासरावांच्या मृत्यूनंतर या समीकरणाला छेद गेला. अलीकडे तर एकापाठोपाठ एक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडाला. महानगरपालिकाही हातची गेली. भाजपची पाळेमुळे घट्ट होऊ लागली. तरीही लातूर शहर आणि ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांमध्ये देशमुखांच्या दोन मुलांना उतरविण्याचा  निर्णय काँग्रेसने घेतला आहे. लातुरातील देशमुखांच्या गढीला पडद्याआडून सत्ताधाऱ्यांची मदत होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने सारेच बुचकळ्यात पडले आहेत.

गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर तालुक्याला जिल्हय़ासहित भाजपने अनेक हादरे देत गढी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न चालवला होता व त्यात यशही आले होते, मात्र कुठून व कशी सूत्रे फिरली हे माहीत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात भाजपने जी धोरणे आखली आहेत त्यातून देशमुखांच्या गढीला भाजपने तटबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

विलासराव देशमुखांचा गड म्हणून लातूर मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी विलासरावांनी साखर कारखाने उभे केले. ग्रामीण अर्थचक्र गतिमान केले. मतदारांशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांच्या हयातीतच २००९ मध्ये त्यांनी राजकारणाची सूत्रे आपले ज्येष्ठ पुत्र अमित देशमुख यांच्या हाती दिली व ते९९  हजार मतांनी लातूर शहर मतदारसंघातून निवडून आले. लातूर ग्रामीण मतदारसंघातून विलासरावांनी तेव्हा वैजनाथ िशदे या कार्यकर्त्यांस उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले होते.

२०१४च्या मोदी लाटेतही शहरातून अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी त्र्यंबक भिसे यांना उमेदवारी दिली व त्यांना निवडून आणले. नंतर झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा निवडणुकांत काँग्रेसची पडझड सुरू झाली व बाभळगावच्या गढीला धक्के बसण्यास सुरुवात झाली. विलासरावांइतकी त्यांच्या मुलाची नाळ जनतेशी नाही ही चर्चाही जोर धरू लागली.

शहर मतदारसंघातून अमित व ग्रामीणमधून धीरज या दोघा बंधूंनी आमदार व्हावे अशी तयारी सुरू केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपच्या रमेश कराडांनी तयारी केली होती. हा मतदारसंघ तसा पूर्वीचा गोपीनाथ मुंडे यांचा रेणापूर मतदारसंघ. या मतदारसंघातून मुंडेंनी भाजपचे कमळ राज्यभर नेले. त्यानंतर या मतदारसंघावर भाजपची पकडही राहिली. भाजपशी सामना करणे अवघड असल्याचे लक्षात घेऊन शिवसेनेच्या पदरात ही जागा कशी जाईल याची व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील रेणापूर पंचायत समितीतील आठही जागा भाजपकडे आहेत. एकही जागा काँग्रेसकडे नाही. शिवसेनेचा तर गावात सरपंचदेखील नाही. शिवसेनेची या मतदारसंघातील ताकद अतिशय नगण्य असल्याने समोरील उमेदवारही तसाच मिळाला आहे. मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या शिवसेनेचे साधे सभासद नसलेल्या सचिन देशमुख यांना कोणाला विश्वासात न घेता तिकीट देऊ केले आहे.