27 May 2020

News Flash

मराठवाडय़ात हाणामारी

नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रामचंद्र भरांडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली.

औरंगाबाद, बीड आणि जालन्यात हाणामाऱ्या; नांदेडमध्ये पावसाची हजेरी

औरंगाबाद :  बोगस मतदानाच्या कारणांमुळे किरकोळ हाणामारीचे प्रकार वगळता मराठवाडय़ातील आठही जिल्ह्य़ांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.८२ टक्के मतदान झाले होते. हे प्रमाण ६२ ते ६५ टक्क्य़ांपर्यंत जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दुपारी तीननंतर मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते औरंगाबादेत भिडले, तर बीड मतदारसंघात क्षीरसागर काका-पुतण्यांच्या समर्थकांत राडा पाहायला मिळाला. नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रामचंद्र भरांडे यांच्या गाडीवर दगडफेक झाली. तर नांदेड  आणि लातूर जिल्ह्य़ात पावसामुळे मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यास बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले.

बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जामखेड येथे निवडणूक प्रतिनिधीला जाब विचारल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी आणि भाजपकार्यकर्त्यांत हाणामारी झाली. यामध्ये तीनजण किरकोळ जखमी झाले. जामखेड येथील भाजपच्या सरपंच अलिमाबी कुरेशी यांचे पती इब्राहिम कुरेशी व राष्ट्रवादीच्या उपसरपंच फैरोजबेगम कुरेशी यांचे पती फैसल कुरेशी यांच्यात हा वाद झाला. या भांडणात जाकेर कुरेशी व फैसल कुरेशी, एजाज पठाण यांना किरकोळ मार लागला. औरंगाबाद येथे बजाजनगर परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांने मोबाईल दुकानावर निवडणुकीच्या कारणावरून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील मोमीनपुरा भागात एमआयएम आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. बोगस मतदान केल्याच्या कारणावरून खासदार इम्तियाज जलील यांना राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी  सौम्य लाठीमार केला. मुखेड येथील चिंचगाव येथील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला होता. तेरू नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाता आले नाही. मुखेडच्या तहसीलदारांनी त्यांचे मतदान व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले.  बीड जिल्ह्य़ातही मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. वडवणी तालुक्यातील खळवट-निमगाव अंतर्गत भीमनायक तांडा येथील पूल वाहून गेल्याने मतदारांना तरफेवर बसवून मतदान केंद्रांपर्यंत घेऊन जाण्याची वेळ प्रशासनावर आली. ६० ते ६५ मतदारांचे मतदान होऊ शकले.

धारणत: ६२ ते ६५ टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांतील १५ हजार ९७४ मतदान केंद्रांवर सरासरी ५७.८२ टक्के मतदान झाले होते. जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी अशी: औरंगाबाद-५८.६४, जालना-६२.४९, नांदेड-६०.७९, परभणी-६१.५०, बीड-५८.२०, उस्मानाबाद-५६.५०, हिंगोली-६३.०७, लातूर-५७.१५.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:38 am

Web Title: violence in marathwada during assembly election 2019 zws 70
Next Stories
1 Video : बोगस मतदानावरून बीडमध्ये क्षीरसागर आक्रमक
2 औरंगाबादेत ४७.२५ टक्के महिला मतदार
3 मला जग सोडून जावं वाटतंय; नव्या भावांनी विष कालवलं – धनंजय मुंडे
Just Now!
X