छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार करू शकतात. त्यासाठी विविध ११ प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य़ धरली जाणार आहेत. पण, त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने ग्राह्य़ केलेल्या ११ कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक / टपाल खात्याव्दारे वितरित छायाचित्रांकित पासबुक, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित

स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार आणि आमदारांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य़ धरले जाणार  आहे.

मतदार चिठ्ठी ग्राह्य़ नाही

मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे. मतदारांकडे आधार कार्डही असून अन्य ११ प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य़ धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य़ मानली जाणार नाही. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे, असे निवडणूक शाखेने म्हटले आहे.