विधानसभेच्या आखाडय़ात उतरलेल्या उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला उद्या गुरुवारी होणार आहे. मतमोजणीची तयारी पाहता दुपार होण्यापूर्वी निकाल हाती येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यत विधानसभेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी विधानसभा मतदार संघात होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले आहे. त्यामुळे निकाल कसा लागणार याचे कुतूहल आहे. यावर मोठय़ा पैजा लागल्या आहेत. निकालाविषयी उमेदवारही साशंक आहेत. आजची रात्र कधी सरणार आणि उद्या कोणता कौल मिळणार याकडे त्यांची नजर लागली आहे.

उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सुरुवातीस टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येऊ न त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजता उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी निरीक्षक, निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत ईव्हीएम ठेवण्यात आलेला कक्ष उघडण्यात येणार आहे. कागल,  राधानगरी व शिरोळ विधानसभा मतदार संघात १४ टेबलांवर, तर जिल्ह्यतील उर्वरित मतदार संघाची मतमोजणी २० टेबलांवर करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर निवडणूक आयोगामार्फत खास मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

अनिर्बंध जल्लोषावर बंधने

आज गुरूवारी कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष, संस्था यांना गावातून, शहरातून मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे, त्याचा वापर करणे, फटाके लावणे अथवा फोडणे यास जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश जिल्हा कार्य क्षेत्रात लागू करण्यात आला आहे.