मतदानाच्या दिवशी लोक मतदानाबाबत फारसे उत्साही दिसले नाहीत. गर्दी कमी दिसली याबाबत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मतदानाची आता सरकारने सक्तीच करायला हवी असं मत व्यक्त केलं आहे. सक्ती केल्यावरच लोक मतदान करतील का? त्यासाठी बाहेर पडतील का? तसं नसल्यास घरी बसून मतदान कसं करायचं याची सोय सरकारने केली पाहिजे असंही मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

एवढंच नाही तर निवडणूक प्रचाराबाबतही नाना पाटेकर यांनी टीका केली. “निवडणूक प्रचार का केला जातो? जर एखाद्या पक्षाने कामं केली आहेत, तर लोक त्यांना निवडून देतील. प्रचार हा प्रकारच मला पटत नाही. मी जर एखादी चांगली गोष्ट केली असेल एक पक्ष म्हणून मग तो कोणताही पक्ष असेल. चांगलं काम केलं असेल तर लोक मतदान करतील. फक्त उमेदवारी जाहीर केली जावी. प्रचाराचा गोंधळ थांबवला की एकमेकांची उणीधुणी काढणं, एकमेकांवर आरोप करणं, आरोपांच्या फैरी झाडणं हे बंद होईल. निवडणुकीचा अमाप खर्च बंद होईल” असंही मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आज महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान पार पडलं. या दरम्यान शहरी भागांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसून आला नाही. नेते-अभिनेते यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान करण्याचं आवाहन ते करत होते. मात्र शहरी भागातील मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. महाराष्ट्रात सरासरी ६०.४५ टक्के मतदान झाले. नाना पाटेकर यांनी मतदान सक्ती लागू केली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.