विधानसभा निवडणुकीत मतदानाचा उत्साह सर्वत्र दिसून येत असतानाच अमरावती जिल्ह्यात एका ऐतिहासिक घटनेची नोंद सोमवारी झाली. तब्बल १२३ अनाथ, अपंग, मतिमंद मुलांना वडिलांचे नाव देणारे शंकरबाबा पापळकर हे या सर्व मुलांना घेऊन मतदानासाठी पोहचले. वझ्झर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

परतवाडा नजीकचे वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर, बेवारस अनाथ बालगृह हे भारतातील एकमेव पुनर्वसन केंद्र आहे. या बालगृहात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून बेवारस, अपंग मुले आजीवन पुनर्वसनासाठी दाखल होतात. या बालगृहातील अपंग मुला-मुलींनी एक किलोमीटर पायी चालत जाऊन मतदान केले. गेल्या १५ ते २० वर्षांपासून ही मुले या बालगृहात राहत आहेत. सर्वाच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हे नाव आहे.

रस्त्यावर, कचराकुंडीत, रेल्वेस्थानके, बसस्थानकारवर तसेच अन्य ठिकाणी माता-पित्यांनी टाकून दिलेल्या मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर हे पित्याप्रमाणे करतात. या मुलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच त्यांचे विवाह लावून देण्याचे अत्यंत आव्हानात्मक कार्य शंकरबाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी त्यांनी चांगलाच लढा दिला. अखेर या मुलांना मतदानासाठी ओळखपत्र मिळाले. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत ४८ मुलांनी मतदानात सहभाग घेतला होता. त्यावेळीही या मुलांनी शासकीय व्यवस्था नाकारून मतदान केंद्रापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतला होता.

वझ्झर येथे अनाथ, अपंग, मतिमंद मुलांचे पुनर्वसन केंद्र आहे. या केंद्रातील १२३ मुला-मुलींना मतदानाचा हक्क मिळाला आहे. आज या सर्व जणांनी पायी चालत जाऊन लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला, याचा आपल्याला आनंद आहे. आम्ही सर्व जण स्वयंप्रेरणेने मतदानासाठी आलो आहोत. मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडायला हवे. – शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.