बोईसरमध्ये १३०० तर पालघरमध्ये १००० रुपये; कमी भत्ता मिळाल्याने संताप

निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची व सहयोगी भूमिका बजावणारे मतदान अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे भत्ता दिल्याने या सर्व प्रक्रियेमध्ये सुसूत्रता नसल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे पालघर विधानसभा क्षेत्राकरिता राखीव ठेवल्या जाणाऱ्या महिला मतदान अधिकाऱ्यांबाबत दुजाभाव केला जात असल्याची तक्रार या महिलांनी केली आहे.

मतदान अधिकारी या पदाकरिता अधिकतर शिक्षकांची नेमणूक करण्यात येत असून या मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, साहित्य वाटपाचा दिवस व मतदानाचा दिवस अशा प्रत्येक पाच दिवशी प्रत्येकी अडीचशे रुपये आणि मतदानाच्या दिवशी आहार भत्ता दीडशे रुपये असे १४०० रुपये मिळणे निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात या पदाकरिता आवश्यक असलेल्या १२० ते १४० टक्के अधिकाऱ्यांना निवडणूक कामांसाठी पाचारण करण्यात येते. यामुळे पालघरमध्ये सुमारे सहाशे अधिकारी राखीव म्हणून तैनात ठेवण्यात आले होते.

एकीकडे बोईसर मतदारसंघात राखीव मतदान अधिकाऱ्यांना रविवारी ९०० रुपये देऊन निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले असताना पालघरमध्ये असलेल्या  राखीव मतदान अधिकाऱ्यांना सोमवारी फक्त १००० रुपये देण्यात आल्याने या राखीव महिलांमध्ये संतापाची लाट उसळली. एकाच निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकष वापरले जात असल्याचे या महिला कर्मचाऱ्यांनी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. असे असताना बोईसर येथील आज कार्यरत राहिलेल्या राखीव मतदान अधिकारी यांना १३०० रुपये देण्यात आल्याचे या महिलांना समजल्यानंतर त्यांनी पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्याचा नोंदवण्याचा प्रयत्न केला.

कोणतेही काम नाही

पालघर येथील राखीव मतदान अधिकारी असलेल्या महिलांना एका प्रशिक्षणाचा भत्ता तसेच दुपारी दोन वाजेपर्यंत थांबले असताना आहार भत्ता देण्यात आल्या नसल्याची तक्रार त्यांनी केली. जव्हार येथून ४० कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाकरिता पाठवण्यात आले होते, मात्र आज दुपापर्यंत त्यांना कोणतेच काम दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांवर दमदाटीचा आरोप

निवडणूक साहित्य रविवारी दुपापर्यंत वितरित करण्यात आल्यानंतरही पालघरच्या महिलांना सायंकाळी सात ते साडे सात वाजेपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले होते, असे आरोप महिलांनी केले आहे. तसेच सकाळी साडेपाच ते सहा वाजता आलेल्राखीव महिला कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत असल्याची तक्रार करण्यात येत होती. याविषयी महिलांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू, अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचे या महिलांनी सांगितले. इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध असताना स्तनदा मातांना अनुपस्थित राहण्याची सवलत देण्यात आली नसल्याचे त्यांनी निदर्शस आणले.

भत्त्याची रक्कम निवडणुकीच्या मार्गदर्शक नियमाला धरून आहे. मतदान सुरू होताना सुमारे ५० हून अधिक ठिकाणी राखीव कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी ठिकठिकाणी पाठवण्यात आले. अनेक राखीव कर्मचाऱ्यांना पेटय़ा गोळा करण्याच्या वेळी लागणाऱ्या प्रक्रियेत तसेच मतदान टक्केवारी मिळवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळात सहभागी होण्याचे आवाहन केले असता काही मोजक्या मंडळानी या कामात सहभाग घेतला तर अधिकतर राखीव कर्मचाऱ्यांनी या कामास नकार दिला. – सुनील शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पालघर