14 November 2019

News Flash

‘वॉर रूम’मधून ४५० मतदान केंद्रांवर नजर

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४५० केंद्रांवरील घडामोडींचे ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले

(संग्रहित छायाचित्र)

वेब कास्टिंग, वाहनांवर जीपीएस यंत्रणेचा वापर

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४५० केंद्रांवरील घडामोडींचे ‘वेब कास्टिंग’ करण्यात आले. या केंद्रांतील बारीकसारीक घडामोडींवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वॉर रूम’मधून नजर ठेवण्यात आली. ‘वॉर रूम’मध्ये एकाच छताखाली नाशिकच्या केंद्रांवरील घडामोडी, निवडणुकीसाठी वापरलेल्या ४०० वाहनांवर जीपीएस यंत्रणेद्वारे नजर, मतदारसंघनिहाय टक्केवारीची माहिती मिळण्याची व्यवस्था झाली. कुठे काही तक्रारी, अडचणी दिसल्यास तत्काळ प्रतिसाद देण्याचे काम करण्यात आले.

यंदाची विधानसभा निवडणूक प्रक्रिया लोकसभेप्रमाणे अधिकाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यात आली. प्रचारार्थ उमेदवारांना परवानगी देण्यापासून ते मतदारांना आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविण्यापर्यंतच्या कामांकरिता विविध अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली होती. दुसरीकडे काही निवडक केंद्रावरील मतदान प्रक्रिया वेबकास्टिंगद्वारे पाहण्याची व्यवस्था करण्यात आली. निवडणूक कामासाठी वापरलेल्या ४०० वाहनांना जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत एकूण ६५ संवेदनशील केंद्रे होती. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एक यानुसार १५ सखी केंद्रांची स्थापना करण्यात आली. संवेदनशील आणि सखी केंद्र असणाऱ्या मतदान केंद्रांचा वेब कास्टिंगमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात आला. जिल्ह्य़ात एकूण चार हजार ५७९ मतदान केंद्रे आहेत. त्यातील किमान १० टक्के केंद्रांवरून वेब कास्टिंग करावे, असे आयोगाला अपेक्षित होते. प्रशासनाने जिल्ह्य़ातील ४५० मतदान केंद्रांवरील घडामोडींचे वेब कास्टिंग केल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

वेब कास्टिंग, जीपीएसच्या आधारे प्रशासनाने संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण राखले. या केंद्रांवरील घडामोडींचे अवलोकन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या स्क्रिनद्वारे केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते. वॉर रुममधून अनेक अडचणी सोडविण्यात आल्या. आधुनिक तंत्रज्ञानाने प्रत्येक घटक दृष्टिपथास आला. त्या त्या केंद्रांवर काय सुरू आहे, निवडणुकीशी संबंधित वाहने यावर नजर ठेवली गेली. एकाच छताखाली अनेक गोष्टी साध्य करण्यात आल्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्य़ातील घडामोडींचे अवलोकन करण्यात आले. मतदान प्रक्रियेतील बातमी आणि तक्रारींवर देखरेख ठेवण्यासाठी तयार केलेल्या वॉर रुमचा पोलीस निरीक्षक योगेश चौधरी, विजय शर्मा यांनी आढावा घेतला. या ठिकाणी वृत्तवाहिन्यांवरील प्रक्षेपण पाहण्यास आले. त्या माहितीतील तथ्य तपासले गेले. याम्ये विसंगती आढळल्यास माहिती देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले.

First Published on October 22, 2019 1:31 am

Web Title: war room look at polling booths akp 94