प्रशांत देशमुख

जिल्हय़ातील चारही मतदारसंघातील उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निकाल ठरणार असल्याने चांगली चुरस निर्माण झाली आहे. वर्धा व हिंगणघाट येथे भाजप आमदारांविरोधात तर आर्वी व देवळीत काँग्रेस आमदारांविरोधात प्रामुख्याने निवडणूक लढवली जात आहे. चारही मतदारसंघात २०१४ चेच उमेदवार परत उभे आहेत. ओल्या दुष्काळाचा अनुभव घेणारा ग्रामीण भाग व ठप्प पडलेली शहरातील बाजारपेठ प्रस्थापितांसाठी आव्हान म्हणून उभी आहे. नैराश्य असलेल्या मतदाराच्या मनातील कौल कोणास लागेल, याचा अंदाज उमेदवारांना येत नसल्याने निकालावर अनिश्चिततेचे सावट आहे.

यावेळी बंडखोरही प्रथमच चर्चेत आले आहेत. हिंगणघाट मतदारसंघात विदर्भातील सर्वात मोठा बंडखोर उभा असल्याचे म्हटले जाते. सेनेचे विदर्भातील एकमेव उपनेते व माजी आमदार अशोक शिंदे यांनी तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भाजपचे आमदार समीर कुणावार यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. तीनवेळा आमदार राहिलेल्या शिंदेंना याठिकाणी मनसेने पाठिंबा दिला असून पक्षातून मात्र त्यांना अद्याप निलंबित करण्यात आले नाही. दुसरीकडे भाजपचे कुणावार यांच्या निवडून येण्याच्या आत्मविश्वासामुळे पक्षातील नेतेही अचंबित झाले आहे. आपल्याला यावेळी विरोधकच नाही, अशा भूमिकेतून  वावरणाऱ्या कुणावार यांना कार्यकर्त्यांचीही तमा नसल्याचा आरोप होतो. पक्षाचे निष्ठावंत म्हटल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी बाळगलेले मौन चर्चेत आहे.

काँग्रेस आघाडीचे राजू तिमांडे हे या लढतीचा तिसरा कोन आहे. राकाँचे नाराज नेते सुधीर कोठारी यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने काँग्रेस आघाडीवर आलबेल नसल्याचे म्हटले जाते. कुणावार यांना शिंदे की तिमांडे लढत देणार याविषयी उत्सुकता आहे.

वर्धा क्षेत्रात भाजपचे आमदार डॉ. पंकज भोयर यांची थेट लढत काँग्रेसच्या शेखर शेंडे यांच्यासोबत आहे. केलेल्या कामांची ग्वाही देत भोयर लोकांपुढे जात आहे. पक्षातील सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस यांनी आपल्या जाहीर भाषणातून भोयर हे राज्यातील पहिल्या पाच कर्तृत्ववान आमदारांपैकी एक असल्याचे पदोपदी सांगत परत निवडून देण्याचे आवाहन केले.

पक्षातील एक गट नाराज असल्याची चर्चा होते. काँग्रेसचे शेखर शेंडे यावेळी तिसऱ्यांदा रिंगणात असून किमान एक संधी देण्याचे भावनात्मक आवाहन ते करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत आपली प्रतिमा सुधारण्यास बऱ्यापैकी यश आल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. जातीय ध्रुवीकरणाचा पैलू आहेच. शेंडे गटाचे राजकीय भविष्य निश्चित करणारी ही निवडणूक असल्याने प्रथमच काँग्रेसजन एकजुटीने त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.

देवळी मतदारसंघात पाचव्यांदा मतदारांना सामोरे जाणारे काँग्रेसचे रणजीत कांबळे यांची लढत सेनेचे समीर देशमुख व भाजप बंडखोर राजेश बकाने यांच्याशी आहे. सेनेचे उमेदवार असलेल्या देशमुखांना मरगळ असलेल्या सेनेपेक्षा भाजप नेत्यांवरच भिस्त ठेवावी लागत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रचाराची सुकाणू हातात ठेवल्याने सेना वर्तुळास कामाला लावण्याचे आव्हान देशमुखांवर आहे. बंडखोर बकाने कितपत चाल मते घेतात,  यावर या मतदारसंघाचे भविष्य ठरणार आहे. आर्वी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमर काळे यांची थेट लढत भाजपचे माजी आमदार दादाराव केचे यांच्याशी आहे.

आमदार नसूनही केचे यांना अंतर्गत गटबाजीचे लागलेले ग्रहण अडचणीत आणू शकते. या ठिकाणी प्रदेश भाजपचे सुधीर दिवे लढण्यास इच्छुक होते. परंतु उमेदवारी न मिळाल्याने ते व त्यांचा गट नाराज झाला. केचेंची आगेकुच त्यांच्यावरच अवलंबून आहे. काँग्रेसचे काळे पक्षातील एकजूट व शेतकऱ्यांचे समर्थन जमेची बाजू मानतात. पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या सभेमुळे बळ मिळाल्याची काँग्रेसची भावना आहे.

एकूणच चारही मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट आहे. फक्त उमेदवारांच्याच भविष्याची चर्चा होते. सेनेचे अशोक शिंदे, राकाँचे राजू तिमांडे, काँग्रेसचे शेखर शेंडे, सेनेचे समीर देशमुख, भाजपचे दादाराव केचे यांचे भविष्य ठरवणारी ही निवडणूक समजली जाते.