मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही आम्ही आलो आहोत आमचा अडसर मोकळा करा. वाटेतून बाजूला झाला नाहीत तर तुमचं काय करायचं ते आम्हाला सांगायची गरज नाही. जो काही फोडाफोडीचा केविलवाणा प्रयत्न केला तो आणखी करा म्हणजे आम्ही आणखी एकजूट होऊ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये आम्ही १६२ हा नारा देऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते एकाच छताखाली आले. तिथे आमदारांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून निशाणा साधला.

मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीस हे वाक्य उच्चारलं होतं. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. एवढंच नाही तर यावेळी सगळ्या आमदारांना एकजुटीची शपथही देण्यात आली.

“भाजपाने आम्हाला गेली २५ वर्षे फसवलं आता आम्ही त्यांना सोडून पुढे आलो आहोत. नवे मित्र जोडले जात आहेत. ही चांगलीच बाब आहे. आत्ता फोटोग्राफरला विचारलं तो म्हणाला लेन्स पुरत नाही. इतके सगळे मित्र जोडले जात आहेत आणि ही एकजूट कायम राहणार आहे” असाही विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

“एवढंच नाही तर येत्या पाच वर्षांसाठी आपलंच सरकार असेल आणि पाच वर्षांसाठीच नाही तर पुढच्या पंचवीस ते तीस वर्षांसाठीच या तीन पक्षांचंच सरकार महाराष्ट्रात येईल यात काहीही शंका नाही. सुरुवात महाराष्ट्रापासून झाली आहे पुढे देशातलीही सत्ता आम्ही काबीज करु” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.