विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आज विधिमंडळात पार पडणार आहे. सकाळी ११ वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. तत्पूर्वी सकाळी १० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर विरोधी पक्ष भाजपाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे.

काल विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारने आपले बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचाच अध्यक्ष निवडून येईल असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यासाठी कथोरे यांनी अर्ज मागे घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने न घेता खुल्या पद्धतीने घ्यावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. मात्र, हे मतदान गुप्त पद्धतीनेच व्हावे अशी मागणी भाजपाने व्यक्त केली आहे.