विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघा दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सत्ताधारी भाजपाविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, नाशिकमध्ये झालेल्या सभेतही त्यांनी भाजपावर तोफ डागली. नाशिकला दत्तक घेऊ, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेचा समाचार घेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाशिकरांना नाही. आम्हाला गरीब बाप चालेल, पण स्वाभिमानी हवा. खरं प्रेम करणारा हवा,” अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

राष्ट्रवादीचे उमेदवार अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये शरद पवार यांची प्रचारसभा झाली. यावेळी पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. पवार म्हणाले, “नाशिकचा विकास छगन भुजबळ यांनी मोठ्या प्रमाणात केला. पण या सरकारने नाशिककडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. एचएएल सारख्या कारखान्याची वाईट स्थिती असो किंवा पर्यटनाला बसलेली खीळ. आता तर शिवाजी महाराजांचा इतिहासच पुस्तकातून काढून टाकण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. तर दुसरीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हे राज्य पुढे घेऊन जाणार आहोत, असं सांगतात. हा दुटप्पीपणा आहे. महाराष्ट्राच्या नव्या पिढीतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व समजावे म्हणून इयत्ता चौथीच्या शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. महाराजांच्या चरित्रामधून नव्या पिढीमध्ये जिद्द निर्माण करण्याची भूमिका पूर्वीच्या सरकारची होती,” असं पवार यावेळी म्हणाले.

“प्रश्न सोडण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याची पावले टाकली हे लोकांना आवडलेलं नाही. विरोधी पक्षातील चार लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. निवडणूक सुरू असताना असा प्रकार घडणं चुकीचं आहे,” असं पवार यांनी सांगितलं.

नाशिकचा विकास झालेला नाही. विकास करण्यासाठी मी नाशिकला दत्तक घेईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. यावरूनही शरद पवार यांनी फडणवीस यांना सुनावले. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आम्ही नाशिक दत्तक घेऊ. मुख्यमंत्र्यांसारख्या दत्तक बापाची गरज नाशिककरांना नाही. आम्हाला गरीब बाप चालेल पण स्वाभिमानी हवा, खरं प्रेम करणारा हवा,” असा टोला त्यांनी लगावला.