राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी ही विरोधातच बसणार आहे. भाजपा शिवसेना युतीला लोकांनी कौल दिला आहे, आम्हाला कौल दिलेला नाही. त्यामुळे मी हे सांगू इच्छितो की आम्ही विरोधी पक्षातच बसणार. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपा आणि शिवसेना यांना जनमताचा कौल मिळाला आहे. सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी कोणतीही भूमिका बजावणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी हे वक्तव्य केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कारण शरद पवार यांनी सक्षम विरोध काय असतो हे निवडणुकीच्या प्रचारात दाखवून दिलं. त्याचंच प्रतिबिंब हे निकालात उमटल्याचं पाहण्यास मिळालं. आता शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपाला सत्ता स्थापणं कठीण आहे. अशात शरद पवार काही भूमिका घेणार का? अशा प्रश्नांवर चर्चा सुरु असतानाच प्रफुल्ल पटेल यांनी सत्ता स्थापनेत राष्ट्रवादी किंवा काँग्रेस कोणतीही भूमिका घेणार नाही विरोधात बसणार हे स्पष्ट केलं आहे.