राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. यानंतर राज्यात पुन्हा भाजापा- शिवसेना युतीचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले तर काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधीपक्षाची भूमिका पार पाडवी लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच, आगामी काळात पक्षाची काय भूमिका असेल व पक्ष कशापद्धतीने काम करणार हे देखील सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील निकालानंतर दुसऱ्यादिवशी बारामतीत आल्यानंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीची भूमिका काय असणार हे स्पष्ट केले आहे.

आमची भूमिका ही आहे की, जनतेने आम्हाला सरकार स्थापनेसाठी नाहीतर विरोधात बसण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आमचे काम कार्यक्षमतेने करू, असे पवार यांनी म्हटले आहे.

या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील पत्रकारपरिषद घेत, आम्हाला ४४ जागा मिळालेल्या आहेत, हा जनमताचा कौल आहे असं आम्ही समजतो. तसेच पाच वर्षे पुन्हा विरोधीपक्षात बसण्याची जबाबदारी आमच्यावर जनतेने दिली असं आम्ही मानतो. त्यामुळे आगामी पाच वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीसह आमच्या मित्रपक्षांचा एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले होते. या निवडणुकीत एकंदर पाहिलं तर जनमताचा जो कौल आहे, तो सत्तेच्या विरोधी आहे, असं आमचं मत आहे. जनमत पाहिलं तर जी सत्ता आहे, तिच्या विरोधी गेलेला हा कौल आहे हे स्पष्ट दिसते असेही थोरात म्हणाले होते.