विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन युतीमधील भाजपा आणि शिवसेनेमध्ये राजकीय वाद रंगल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आता शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना एक सूचक वक्तव्य केले आहे. सत्ता स्थापनेवरुन प्रश्न विचारला असता उद्धव यांनी ‘जे जे शक्य होईल ते करणारच’ असं उत्तर पत्रकारांना दिलं.

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपाने आज विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड केली. मात्र शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. असं असतानाही महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा फडणवीस यांनी विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर केला आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर तडजोड करण्यास तयार नसल्याचे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. ‘सत्ता स्थापनेसाठी जे जे शक्य होईल ते करणारच’ असं वक्तव्य करुन उद्धव यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपाने अद्याप शिवसेनेशी संपर्क केलेला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

आज भाजपाने विधिमंडळ नेतेपदी फडणवीस यांनी निवड केली असून शिवसेना विधिमंडळामध्ये पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड गुरुवारी करणार आहे. विधिमंडळ नेतेपदी फडणवीस यांची एकमताने निवड झाल्याने तेच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे आता स्पष्ट झाले आहे. गुरुवारी फडणवीस आणि उद्धव यांच्यामध्ये फोनवरुन युतीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर शिवसेनेचा कल लक्षात घेत राज्यपालांकडे ते सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते या नात्याने सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात.

दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आल्याचे समजते.