निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे तसेच निकालाचीही तारीख जाहीर केली आहे. मागील पाच वर्षांच्या भाजपा आणि शिवसेना सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षांच्या विरोधातील राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे त्यामुळे निवडणूक निकालानंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या आघाडीचं सरकार येईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

संगमनेर येथे पत्रकारांशी बाळासाहेब थोरात बोलत होते. “काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. भाजपा शिवसेना सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. या सरकारच्या काळात राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त म्हणजेच १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठा गाजावाजा केलेली कर्जमाफी योजना फसलेली आहे.” असाही आरोप थोरात यांनी केला.

“८९ लाखांपैकी ५० टक्के शेतक-यांनाही कर्जमाफी मिळालेली नाही.  शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव नाही. पीक विमा मिळत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आर्थिक मंदीमुळे उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. राज्यातील दुष्काळ आणि पूर हाताळणीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारकडे आर्थिक नियोजन नसल्याने राज्यावरील कर्जाच्या बोज्यात गेल्या पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. हे मुद्दे आघाडी जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेला भेडसावणाऱ्या या ज्वलंत प्रश्नांवरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत.” असंही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील जनता या निवडणुकीत मस्तवाल भाजप शिवसेनेचा पराभव करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विजय करेल व निवडणूक निकालानंतर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.