नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत सरकार फेरविचार करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजापूर येथे म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश कोकणात आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारला रिफायनरी प्रकल्प आणण्याबाबत फेरविचार करु असं म्हटलं आहे. नाणार प्रकल्पामुळे एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प आणण्याचा फेरविचार आम्ही करतो आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नाणारबाबत ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपा यांच्यात कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत. कारण नाणार प्रकल्प कोकणात आणण्यास शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

राजापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ” नाणार प्रकल्पाचा फेरविचार केला जाणार आहे. मी घसा फोडून सांगत होतो हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र ज्या प्रकारे प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला. मात्र इथे आलो तुम्हा सगळ्यांचा उत्साह पाहिला त्यामुळे नाणारचा विषय काढतो आहे. या प्रकल्पामुळे 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाबाबत आत्ता कोणताही निर्णय जाहीर करत नाही मात्र या प्रकल्पाचा फेरविचार केला जाईल ” असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपा यांच्यात जुंपण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आरे कारशेडबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सोमवारीच नाणारचं जे झालं तेच आरेचं होणार असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी नाणारचा फेरविचार केला जाईल असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन पक्षांमध्ये जुंपणार असंच चित्र आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध दर्शवला होता. त्यामुळे याबाबतचा निर्णय मागे घेण्यात आला होता. आता निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि युतीचं काय होणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारचा फेरविचार होईल असं म्हटलं आहे.