भाजपासोबस संधान साधून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार टि्वटरवर अॅक्टीव्ह झाले असून, त्यांनी अनेक भाजपा नेत्यांच्या शुभेच्छांवर ‘धन्यवाद’ असे रिप्लाय करून नव्या शक्यतांना तोंड फोडले आहे.

शनिवार सकाळी अजित पवार यांनी भाजपासोबत घरोबा केल्याचा बॉम्ब टाकल्यापासून ते गायब होते. एकदा माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करून अजित पवार गायब झाले होते. तेव्हापासून त्यांनी कोणालाही प्रतिक्रिया दिली नव्हती. बंधु श्रीरंग पवार यांच्या घरी ते होते. तेथेच त्यांना राष्ट्रवादीचे नेते भेटायला गेले होते. जयंत पाटील यांनीही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आमदार रोहीत पवार यांनीही फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहून अजित पवार यांना साद घातली. पण, अजित पवार कोणालाही बधले नाहीत. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

रविवारी साडेचार वाजताच्या आसपास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या टि्वटला सकारात्मक उत्तर दिले आहे.

१० मिनिटांमध्ये त्यांनी जवळपास १५ टि्वट करून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेच संकेत दिले आहेत. कोणी कितीही मनधरणी केली तरी आपण हे पद सोडणार नाही, असेच त्यांनी सूचित केले आहे. त्यांनी त्यांच्या टि्वटरवर ‘उपमुख्यमंत्री’ असेही ‘बायो’ ठेवले आहे. त्यावरून आपण आता मागे हटणार नाही, हेच त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांनी आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी हेच बायोमध्ये ठेवले आहे. अजित पवार यांना आमदारांच्या पाठिंब्याचा विश्वास असल्याचेच यातून ध्वनित होते.