“अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो,” असं वक्तव्य करणारे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. हे उत्तर देताना उद्धव यांनी युतीच्या चर्चेच्या वेळेस मतोश्रीवर अमित शाह आले होते त्यावेळी त्या बैठकीमध्ये काय घडले याबद्दलची माहिती दिली.

“युतीच्या चर्चेसाठी मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर माझ्या भेटीसाठी आले होते. त्याआधी झालेल्या बैठकीमध्ये आमचे बोलणे फिस्कटले. मात्र त्यानंतर अमितजींचा मला फोन आला आणि त्यांनी मला उद्धवजी आपको क्या चाहिए असा सवाल केला. तेव्हा मी माझ्या वडिलांना मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेल असे वचन दिले आहे, असं सांगितलं,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. “बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मला बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अमित शाह आणि फडणवीस यांची गरज नाही,” असंही फडणवीस म्हणाले.

“या फोनवरील चर्चेनंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर माझ्या भेटीसाठी आले होते. तेव्हा मी आणि अमित शाह मातोश्रीमधील बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बसलो होतो. यावेळी त्यांनी माझ्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध खराब झाले तर ते मला पुन्हा सुधरवायचे आहेत, अशी भावना व्यक्त केली. तेव्हा तुम्ही हे इतकं बोललात हेच मला खूप असल्याचे मी त्यांना सांगितले,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तुम्ही हे तुमचे बोलणे तुमच्या नेत्यांनाही सांगा अशी विनंती मी शाह यांच्याकडे केली होती असंही उद्धव यांनी या भेटीसंदर्भात बोलताना स्पष्ट केलं.

पुढे बोलताना “तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल त्याप्रमाणे सत्ता आल्यास पदाचे आणि जबाबदारींचे समसमान वाटप होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपद आणि त्यासंबंधित जबाबदारी त्याचाच भाग आहे,” असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.