News Flash

बहुमत चाचणी नेमकी काय असते?, ती कशी घेतली जाते?

महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी

बहुमत चाचणी

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र बहुमत चाचणी म्हणजे काय आणि ती कशी घेतली जाते याबद्दल खूपच कमी लोकांना ठाऊक असते. त्यामुळेच यावर टाकेलेली नजर…

बहुमत म्हणजे काय?

  • विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात.
    बहुमत चाचणीला इंग्रजीमध्ये फ्लोअर टेस्ट असं म्हणतात.
  • सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं.
  • सभागृहातील सर्वात मोठा पक्ष (किंवा सत्ताधारी पक्ष) सत्ता स्थापनेचा दावा करतो.
  • निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो.
  • ठराविक एका बाजूने मतदान करण्यात यावेसाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हीप म्हणजेच पक्षादेश काढला जातो. व्हीप असला तरी मतदान करायचं की नाही याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. मतदान जर पक्षादेशानुसार झाले नाही तर आमदारावर पक्ष कारवाई करु शकतो.
  • बहुमत चाचणीच्या वेळी जेवढे आमदार मतदान करतात तो आकडा गृहित धरुन त्याच निकषांवर बहुमताचा आकडा ठरवला जातो.
  • बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.

बहुमताचे एकूण चार प्रकार आहेत

साधे बहुमत
साधे बहुमत म्हणजे उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत

पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत
सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्याहून अधिक सदस्य एका ठराविक पक्षाचे असणे

प्रभावी बहुमत
सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय.

विशेष बहुमत
साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो:
> सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत
> हजर व मतदानात भाग घेणार्‍या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत
> पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्‍या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत

महाराष्ट्रातील स्थिती काय

महाराष्ट्राच्या विधिमंडळाची एकूण आमदार संख्या २८८ इतकी आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बहुमतचा जादूई आकडा १४५ इतका आहे. म्हणजेच बहुमत चाचणीला सर्व आमदार सभागृहामध्ये उपस्थित असतील तर सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या पक्षाच्या बाजूने १४५ किंवा त्याहून अधिक आमदारांनी मतदान केल्यास सरकार बनवता येते (किंवा कायम राहते) सध्या भजापाने आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा आहे असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 12:07 pm

Web Title: what is the meaning of floor test in maharashtra scsg 91
Next Stories
1 बहुमत सिद्ध करुनच दाखवू – चंद्रकांत पाटील
2 “उद्या सायंकाळपर्यंत भाजपाचा खेळ संपल्याचे स्पष्ट होईल”
3 काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड
Just Now!
X