जे आपल्या जुन्या सहकार्याला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत ते जनतेला दिलेला शब्द काय पाळणार? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या एका पत्रकार परिषदेतील व्हिडिओद्वारे त्यांना आठवण करुन दिली आहे.

पाटील म्हणतात, “‘दिलेल्या शब्दाला जागतो’ असे स्वतःचे ब्रँडिंग करणारे मुख्यमंत्री २५ वर्षे सहकारी असलेल्या शिवसेनेला दिलेला शब्द पाळू शकत नाहीत. स्वतःच्या इतक्या जुन्या सहकाऱ्याला दिलेला शब्द जो माणूस पाळू शकत नाही, ते महाराष्ट्राच्या जनतेला दिलेले शब्द कसे पाळणार?”

आपल्या या विधानाला संदर्भ देताना पाटील यांनी ट्विटद्वारे फडणवीसांचा १८ फेब्रुवारी २०१९चा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा पत्रकार परिषदेतील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री म्हणतात, “पुन्हा निवडून आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीने जे पद आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात येतील, त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हा ही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे.”

राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी कौल दिला आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीतील या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पद आणि जबाबदाऱ्यांमध्ये समानता राखण्याच्या भाजपाने दिलेल्या शब्दाची आठवण ठेवत मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे विभागून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. मात्र, भाजपाला हे मान्य नसल्याने विधानसभा निवडणुकीचा निकाल येऊन १४ दिवस झाल्यानंतरही अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही.